वेंगुर्ला
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सहकारातून विकासाची कल्पना १९६० पासून अंमलात आणली. सहकारावर कायद्याची बंधने असणारा कायदाही आणला. प्रत्येक गावात शेतक-यांनी सहकार माध्यमासाठी सहकारी संस्थाची स्थापना केली. त्यातूनच साखर उद्योग, वेतक्रांतीची सुरूवात झाली. आपल्या भागातील पिकणारा माल हा सहकाराच्या माध्यमातून ग्राहक भांडार चालू करून प्रत्येक भागात विकला जाऊ लागला. या सहकारामुळे गावागावातील लोक एकत्र आले. सहकारातील उद्योग व व्यवसायामुळे रोजगारीही वाढली. त्यामुळे सहकारी तत्त्वावर चालविलेले व्यवसाय हे रोजगार निर्मितीबरोबरच विकासाचे माध्यम आहे. असे प्रतिपादन कृषिभूषण एम.के.गावडे यांनी सहकार सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमांत केले. येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या कॅम्प येथील सभागृहात सहकार सप्ताहाचा समारोप कार्यक्रम कृषिभूषण एम.के.गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी सुर्यकांता सहकारी संस्थेच्या चेअरमन माधवी गावडे, महिला काथ्या प्रकल्याचा व्यवस्थापकिय संचालिका तथा कृषिभूषण प्रज्ञा परब, रयत शिक्षण संस्थेचे डायरेक्टर अॅन्थोनी डिसोजा, राष्ट्रवादी जिल्हा सदस्य नितीन कुबल, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, कृषि कंन्सलटंट नितेश मयेकर आदी उपस्थित होते. आपल्या भागातील महिला काथ्या संस्थेने सहकारातून महिलांना काथ्या व्यवसायातून रोजगार दिला. गायी व म्हैशी यावर आधारीत व्यवसाय घाटमाथ्यावर सहकारातून निर्माण झाले. कोल्हापूरातील गोकुळ दुध निर्मिती सहकारी संस्थेने ५० लाख लिटर दरदिवशी क्षमता निर्माण केली असल्याचेही एम.के.गावडे म्हणाले. सिधुदुर्ग जिल्ह्यात ख-या अर्थाने एम.के.गावडे यांनी सहकार रूजवला. त्यामुळे विविध संस्थाची निर्मिती होऊन अनेकांना रोजगारही मिळाला आहे. सहकाराबाबत पूर्ण ज्ञान असलेली व्यक्ती ही एम.के.गावडे असून सहकारी संस्था निर्मितीतून या जिह्यातील लोकांना त्यांची कक्षा वाढवून आपल्या भागाचा विकास साधा असे आवाहन अॅन्थोनी डिसोजा यांनी केले.