२२ ते २४ नोव्हेंबरला कार्यक्रम : भाजप नेते निलेश राणेंच्या हस्ते उद्घाटन
मालवण
मालवण पंचायत समितीच्यावतीने २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत पंचायत समिती आवार येथे लोककला महोत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. या लोककला महोत्सवाचे उद्घाटन २२ नोव्हेंबर रोजी भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परूळेकर यांनी दिली.
सभापती दालनात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी श्री. पाताडे म्हणाले, वृद्ध व उपेक्षित कलाकारांना वाव मिळावा तसेच लोककलावंतांना राजाश्रय मिळावा यासाठी लोककला महोत्सवाचे आयोजन केले आहे. या लोककला महोत्सवाला तालुक्यातील प्रत्येक गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. प्रत्येक मतदारसंघनिहाय कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्रत्येक मतदारसंघाचे दिड तासांचे लोककलांचे कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माजी खासदार नीलेश राणे, आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, आरोग्य सभापती अनिषा दळवी, महिला व बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, दिपक परब, दत्ता सामंत, बाबा परब, सनी कुडाळकर, तसेच सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत. २२ रोजी सकाळी ७ वाजता किल्ले सिंधुदुर्ग येथून शिवज्योत आणण्यात येईल. ही शिवज्योत तीन दिवस कार्यक्रमस्थळी ठेवण्यात येणार आहे. जिल्हा परिषद सदस्यांच्या हस्ते शिवज्योत प्रज्वलित करून लोककला महोत्सवाच्या कार्यक्रमांचा प्रारंभ केला जाईल. ढोलवादन व सनई वादनाने कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. त्याचबरोबर स्टॅच्यू कार्यक्रमाचे विशेष आर्कषण असणार आहे. उद्घाटन कार्यक्रमात गोळवण येथील ५० ते ६० कलाकारांचा दिंडी कार्यक्रम होईल. ठाकर समाजाचा गोंधळ व शिवकालीन भाषेचा कार्यक्रम, दशावतारी कलावंत ओमप्रकाश चव्हाण यांचे दशावतारी नाटक, पोईप येथील कलावंताचे मुरलीवादन, भजन, फुगडी नृत्य आदि कार्यक्रम होणार आहेत. खरारे पेंडूर येथील कलावंतांची एकांकिका सादर होईल. उद्घाटनप्रसंगी नामवंत लोककलावंतांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे श्री.पाताडे, श्री. परुळेकर यांनी स्पष्ट केले.