वेंगुर्ले
मोचेमाड समुद्रात पारंपारिक मासेमारी पद्धतीने करण्यात येत असलेल्या रापण या मासेमारी प्रकारातील जाळ्यात आज १८ नोव्हेंबर रोजी तीन मोठे डॉल्फिन मासे सापडून आले. रापण संघाच्या सदस्यांनी या डॉल्फिन माशांना जाळ्यातून सुखरूप बाहेर काढून पुन्हा समुद्रात सोडत जीवदान दिले. रापणीच्या जाळ्यात सापडलेल्या या डॉल्फिन माश्यांना पाहण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी समुद्रकिनाऱ्यावर एकच गर्दी केली होती.
मोचेमाड येथील समुद्रात पारंपरिक रापण पद्धतीची मासेमारी केली जाते. रोजच्याप्रमाणे श्री समर्थ रापण संघाच्या सदस्यांनी सकाळी समुद्रात रापणीची जाळी टाकली व ती बर्याच वेळाने सदस्यांनी ओढत किनार्यावर आणली असता त्या जाळ्यात चक्क मोठे तीन डॉल्फिन मासे असल्याचे दिसून आले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता अडकलेल्या तीनही डॉल्फिन माशांना जाळ्यातून सुखरूप बाहेर काढत पुन्हा समुद्रात सोडून देत त्यांना जीवदान दिले.
हिवाळ्याच्या मोसमात हे डॉल्फिन मासे समुद्रात मोठ्या प्रमाणात दृष्टीस पडत असतात. समुद्रात डुबक्या मारत हे डॉल्फिन थव्याने फिरत असतात काही ठिकाणी तर हे डॉल्फिन दर्शन घेण्यासाठी पर्यटक होडीतुन समुद्रात फेरफटका मारतात. परंतु इथे तर चक्क डॉल्फिनचं जाळ्यात सापडले असल्याने माश्यांना पाहण्यासाठी समुद्र किनारी गर्दी झाली होती.
या डॉल्फिन माशांना रापण संघातील सदस्य महादेव तांडेल, विपुल पवार, रमाकांत कोचरेकर, सागर कोचरेकर, जयेश तांडेल, नारायण आरावंदेकर, पियेश तांडेल, आनंद सातोस्कर, जगन्नाथ तांडेल, संतोष पवार, चिन्मय कुर्ले, साहिल कुबल या मच्छीमार बांधवांनी सुखरूप समुद्रात सोडून जीवदान दिले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.