पालिका मुख्याधिका-यांना निवेदन सादर
सावंतवाडी
शहरात खोदलेल्या रस्त्याचे चर बुजवण्याचे काम करणा-या संबंधित ठेकेदाराकडून चुकीचे काम केले जात आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सावंतवाडीचे नगरसेवक तथा शिवसेनेचे पदाधिकारी सुरेंद्र बांदेकर यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. चुकीच्या पद्धतीने संबंधित ठेकेदाराकडून काम सुरू आहे. त्या ठिकाणी सुपरवायझर अथवा कोणताही अधिकारी नाही. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम होऊन त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान या कामाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.