जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या कवयित्री सायली कुलकर्णी यांची रचना
लेक बोले पोटातून
नको मारु मला जीवे
नको खुडू गं कळीला
फुल उमलू दे नवे
तुझी गोजिरी ही लेक
मोठी होईल शिकून
तिच्या कर्तुत्वाने तुझा
उर येईल भरून
जीव लावीन साऱ्यांना
नाही देणार अंतर
उभी राहीन जिद्दीने
नाही बनणार भार
जन्म मिळाला लेकीचा
माझा हाच का गं गुन्हा
सांग लेक नसताना
वंश वाढेल का पुन्हा
जर पुत्र असे दिवा
लेक असते पणती
उजळीते दोन्ही घरे
सदा राहून तेवती
नको चिंता माझी करु
जगा पुरून उरीन
तुझी लेक असे दुर्गा
पूर्ण सक्षम होईन
कर साऱ्यांना विरोध
देई जन्म मला नवा
तुझे फेडीन मी पांग
फक्त आशिर्वाद हवा
©सायली कुलकर्णी