You are currently viewing युवा मतदारांनी मतदार नोंदणी करावी…

युवा मतदारांनी मतदार नोंदणी करावी…

मुख्य निवडणूक आयोगाचे अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन

व्होटर अ‍ॅपबाबत उपस्थितांना केले मार्गदर्शन

कणकवली

18 ते 21 वर्षे वयोगटातील युवा वर्गाचे मतदार यादीतील प्रमाण हे लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी आहे. युवावर्ग मतदान प्रक्रियेपासून जर बाहेर राहत असेल तर ही चिंतेची बाब आहे. लोकसंख्येच्या तुलनेत युवक वर्ग हा मतदान प्रक्रियेपासून बाहेर राहत असल्याने या घटकाला मतदान प्रक्रियेत येण्याकरिता भारतीय निवडणूक आयोगाकडून जनजागृती करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाकडून व्होटर हेल्पलाइन ॲप द्वारे देखील तुम्हाला सर्वतोपरी माहिती दिली जाते. त्यामुळे जास्तीत जास्त नवमतदार नोंदणी, मयत, दुबार मतदार नावे रद्द करणे, नवविवाहितांचे नावे नोंदवणे या प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन भारतीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. तसेच कणकवली नगरपंचायत मध्ये आयोजित केलेल्या या विशेष शिबिरादरम्यान महिलांच्या असलेल्या उपस्थिती बद्दलही श्री. देशपांडे यांनी कौतुकोद्गार काढले.

कणकवली नगरपंचायत च्या वतीने कणकवली नगरपंचायत च्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्री देशपांडे बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जयकृष्ण फड, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार प्रिया हर्णे, नायब तहसीलदार शिवाजी राठोड, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगराध्यक्ष समीर नवलावंडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, किशोर राणे, नगरपंचायत व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, व्होटर हेल्पलाइन ॲप डाऊनलोड करून यासंदर्भात जनजागृती अधिक प्रभावी होण्याची गरज आहे. हे ऍप कशा पद्धतीने हाताळायचे त्याबाबत श्री देशपांडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या शिबिराला असलेली महिलांची उपस्थिती पाहून श्री. देशपांडे यांनी नगरपंचायतीच्या आयोजनाचे कौतुक करत, महिलां जवळ ही माहिती पोहोचणे म्हणजे हा कार्यक्रम यशस्वी झाला असा अर्थ होतो. कारण महिलांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबापर्यंत याची प्रभावी जनजागृती होते. याकरिताच राज्यात यापूर्वी अनेक स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या. येत्या काळात मतदान जनजागृती करिता फुगडी स्पर्धा घेण्याचाही मनोदय व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा