सावंतवाडी
दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या श्री देवी सोनुर्ली माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव २० नोव्हेंबर रोजी होत आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा जत्रोत्सव झाला नसल्याने यंदा दोन वर्षांनी होणाऱ्या या जत्रोत्सवाबाबत भक्तगणांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सोनुर्ली माऊलीचा जत्रोत्सव राज्यातील प्रसिद्ध जत्रोत्सवातील एक मानला जातो. लोटांगणाची जत्रा म्हणूनही हा जत्रोत्सव प्रसिद्ध आहे. माऊली देवीच्या पायाशी लोटांगण घालून हजारो भाविक नवसफेड करतात. राज्यभरातून हजारो भाविक जत्रोत्सवास उपस्थित राहून माऊली चरणी लीन होतात. विविध प्रकारच्या वस्तू तसेच खाद्य पदार्थांची शेकडो दुकानें लावली जातात. लाखो रुपयांची उलाढाल या जत्रोत्सवात होते. लोटांगण सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक आवर्जून उपस्थित असतात. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा जत्रोत्सव रद्द करण्यात आला होता. यंदा मात्र कोरोनासंबंधीचे बहुतांशी निर्बंध शासनाने उठविल्याने सोनुर्ली जत्रोत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करण्याचे ग्रामस्थांनी ठरविले आहे. त्यामुळे यावर्षी भाविकांची उपस्थिती लक्षणीय असणार हे नक्की! दरम्यान, दोन वर्षांनी होणाऱ्या सोनुर्ली माऊली जत्रोत्सवात कोरोना संबंधीच्या सर्व नियमांचे पालन होणार आहे. त्यामुळे भाविकांनीही कोरोना नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन सोनुर्ली ग्रामस्थांनी केले आहे.