You are currently viewing आंबा, काजू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५१.७१ कोटींची नुकसान भरपाई – सतीश सावंत

आंबा, काजू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५१.७१ कोटींची नुकसान भरपाई – सतीश सावंत

प्रधानमंत्री फसल विमा योजनेतून शेतकऱ्यांना मदत

कणकवली

आंबा, काजू उत्‍पादक शेतकऱ्यांना गेली काही वर्षे लहरी हवामानाचा फटका बसत आहे. मात्र ज्‍या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल योजनेंतर्गत विमा उतरला होता, अशा जिल्ह्यातील २२ हजार ८५७ शेतकऱ्यांना ५१.७१ कोटींची नुकसान भरपाई प्राप्त झाली आहे. यातील जिल्‍हा बँकेकडे ६ हजार ३०५ सभासदांना १९ कोटी ९३ लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात आली असल्‍याची माहिती जिल्‍हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.
तसेच पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. तत्‍पूर्वी आंबा, काजू उत्‍पादक शेतकऱ्यांनी जिल्‍हा बँकेच्या शाखेत किंवा गावातील सोसायट्यांमध्ये आपल्‍या पिकाचा विमा उतरावा असेही आवाहन श्री.सावंत यांनी केले आहे.
येथील जिल्‍हा बँकेच्या सभागृहात श्री.सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन पीक विमा योजनेची माहिती दिली. ते म्‍हणाले, कोकणात अवेळी पाऊस आणि वाढलेले तापमान यामुळे प्रामुख्याने आंबा आणि काजू पिकाचे नुकसान होते. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही अंशी मदत मिळावी यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना कार्यान्वित आहे. पूर्वी या योजनेतील निकषांमुळे कोकणातील शेतकऱ्यांना या योजनेचा फारसा फायदा होत नव्हता. मात्र माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषी मंत्री दादा भूसे यांनी पीक विमा कंपन्यांशी चर्चा करून पीक विम्‍याच्या निकषात बदल केले आहेत. यात पूर्वी १ एप्रिल ते १५ मे या कालावधीत २५ मिलिमिटरपेक्षा जास्त पाऊस झाला तरच नुकसान भरपाई मिळत होती. हा निकष आता १० मिलि एवढा करण्यात आला आहे. तर सलग तीन दिवस ३७ अंशापेक्षा जास्त तापमान झाल्‍यास पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे.
श्री.सावंत म्‍हणाले, पूर्वी पेक्षा नुकसान भरपाई रक्‍कमेतही आता वाढ झाली आहे. यात जास्त तापमानामुळे पूर्वी हेक्‍टरी ६ हजार १०० रूपये नुकसान भरपाई मिळत होती. ती आता १४ हजार १०० एवढी वाढविण्यात आली आहे. याखेरीज हवामानावर आधारीत पूर्वी ३९ ठिकाणी महसूल मंडळे होती ती आता ५८ एवढी वाढविण्यात आली आहेत.
चार हेक्‍टर पर्यंत शेती-बागायती असलेल्‍या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. तसेच योजनेत सहभागासाठी सात बारा वर आंबा आणि काजूची नोंद असणे आवश्‍यक आहे. यंदा विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. त्‍यामुळे या तारखेपूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरावा असे आवाहनही श्री.सावंत यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा