पोलीस म्हटल्यावर त्यांच्याकडे पाहण्याची प्रत्येकाची एक वेगळी नजर असते, वेगवेगळे समज असतात. नवं युवकांसाठी तर वाहतूक पोलीस म्हणजे रस्त्यातील कर्दनकाळ. परंतु कुडाळ काळप नाका येथे अपघातग्रस्त झालेल्या युवकासाठी मात्र वाहतूक पोलीस प्रकाश गवस हे देवदूतच ठरले.
घावनळे येथील चैतन्य सुकी हा युवक आपल्या ताब्यातील ऍक्टिव्हा स्कूटर (एम एच ०७/ एम ७५६०) ने कुडाळ काळप नाका येथील हायवेवरील फ्लायओव्हर ब्रिजवरून जात असताना पाण्याने भरलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने गाडीवरून पडल्याने डावा पाय फ्रॅक्चर झाल्याने जखमी अवस्थेत रस्त्यावर विव्हळत पडला होता.
कणकवलीहून वेंगुर्ला येथे ड्युटीवर जाणारे वाहतूक पोलीस हवालदार प्रकाश गवस यांच्या निदर्शनास सदर घटना येताच तात्काळ त्यांनी प्रायव्हेट गाडी थांबवून जखमी चैतन्यला कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. ट्रॅफिक कंट्रोल करताना सक्तीने वावरणारे पोलीस हवालदारांमध्ये सुद्धा माणुसकीचा गहिवर असतो हे हवालदार प्रकाश गवस यांनी दाखवून देत पोलिसांच्या कामगिरीवर आपल्या कृतीतून प्रकाश पाडला.
पावसाचा कहर चालू असतानाही रस्त्यावर पडलेल्या युवकासाठी धावून जाणाऱ्या हवालदार प्रकाश गवस यांचे जखमी चैतन्य याने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आभार मानले.