सावंतवाडी
गुजरात अहमदाबाद येथे पार पडलेल्या ऑल इंडिया जी. व्ही. मावळणकर नेमबाजी स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते. त्यातील सात नेमबाजांची निवड राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी झाली आहे. यावेळी निवड झालेल्या खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोशियनच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
यात १० मी. एअर पिस्तूल प्रकार सबयुथ गटात कु. साहिश दिगंबर तलनकर (दोडामार्ग) याने ४०० पैकी ३७० गुण मिळविले तर याच गटात सहभागी झालेला कु.आयुष दत्तप्रसाद पाटणकर (सावंतवाडी) याने ४०० पैकी ३४८ गुणांची नोंद केली.युथ गटात कु.स्वानंद प्रशांत सावंत(सावंतवाडी) याने ३५५ गुणांसह यशस्वी कामगिरी केली. हे सर्व खेळाडू दिल्ली येथे दिनांक १८ नव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्याने होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये सहभागी होतील.त्याच प्रमाणे १० मी. एअर रायफल प्रकारात सब युथ गटात कु. संजना अमोल बीडये (सावंतवाडी) हिने ४०० पैकी ३७७ गुण,याच गटात व क्रीडा प्रकारात कु. वैष्णवी गोविंद भांगले (बांदा) हिने ३७० गुण तर मुलांच्या गटात कु. शमित श्याम लाखे (सावंतवाडी)याने ३६७ गुणांची नोंद केली.रायफल प्रकारातील राष्ट्रीय स्पर्धा ही भोपाळ येथे दिनांक २५ नव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे.
हे सर्व खेळाडू महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करतील.तसेच या राष्ट्रीय स्पर्धे साठी यापूर्वीच आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री.अतुल लक्ष्मण नाखरे याची निवड गोवा राज्य संघातून झाली आहे.राष्ट्रीय स्पर्धे मध्ये चांगली कामगिरी करणारे नेमबाज भारतीय निवड चाचणी साठी पात्र ठरतील. वरील सर्व निवड झालेले खेळाडू उपरकर शूटिंग रेंज सावंतवाडी व बांदा येथे सराव करत असून त्यांना प्रशिक्षक कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण लाभले तसेच आंतरराषट्रीय प्रशिक्षक श्री.विक्रम भांगले यांचे मौलिक मार्गदर्शन मिळाले.श्री. भांगले यांची निवड भोपाळ येथील स्पर्धेसाठी चीफ रेंज ऑफीसर आणि जुरी म्हणून राष्ट्रीय नेमबाजी संघटनेने केली आहे.सर्व निवड झालेल्या खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या.