You are currently viewing आघाडी सरकार व पालकमंत्र्यांना टार्गेट करण्यासाठी “तो” निधी परत

आघाडी सरकार व पालकमंत्र्यांना टार्गेट करण्यासाठी “तो” निधी परत

राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक

आपली निष्क्रियता लपविण्यासाठी भाजपवाल्यांची केविलवाणी धडपड

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील जनतेच्या विकासासाठी प्राप्त झालेला ४३ कोटी रुपयांचा अखर्चित निधी महाविकास आघाडी सरकार आणि पालकमंत्री उदय सामंत यांना टार्गेट करण्यासाठीच परत पाठविला. त्यामुळे आपली निष्क्रियता लपविण्यासाठी कुणाला तरी आपले वाटेकरी करण्याची केविलवाणी धडपड भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी करु नये, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक यांनी लगावला आहे. दरम्यान या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी ही जिल्हा परिषदेच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींची आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून परत गेलेल्या निधीबाबत त्यांनी आत्मचिंतन करावे, असेही त्यांनी सांगितले. याबाबत श्री.सुद्रीक यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर राणे समर्थक भाजपची एकहाती सत्ता आहे. प्रशासकिय दृष्ट्या जरी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमुख असले तरी प्रशासकीय कामकाजावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पटलावर लोकप्रतिनिधीना सभागृहात पाठविले जाते. पण ज्या उद्देशाने या लोकप्रतिनिधींना जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाठविले. त्या उद्देशालाच राणे समर्थक भाजपाने हरताळ फासला म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या विकासासाठी प्राप्त झालेला ४३ कोटी रुपयांचा अखर्चित निधी परत पाठविण्याचा घेतलेला तुघलकी निर्णयाची संपूर्ण जबाबदारी ही जिल्हा परिषद निष्क्रिय लोकप्रतिनिधींची आहे. ती प्रशासकीय अधिकारी यांच्या वर जबाबदारी झटकता येणार नाही.

राज्य शासनाकडून प्राप्त झालेला विकास निधी उपलब्ध किती झाला? कोणत्या कारणासाठी आला ? आलेला निधी नियोजन बद्ध खर्च होतो का ? याची खातरजमा करण्याची संपूर्ण जबाबदारी जनतेचे सेवक म्हणून जिल्हा परिषद सदस्यांची आहे. आपले अपयश झाकण्यासाठी तकलादू खुलासे करून जिल्ह्यातील जनतेचे लक्ष विचलित करून स्वतः नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करुन आपले अपयश झाकण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात रचलेले नियोजित कुंभाड आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे भाजपच्या सततच्या नकली सर्व राजकीय खेळीऺच्या बनवेगिरीला जिल्ह्यातील जनता भुलणार नाही.त्यामुळे आपली निष्क्रियता लपविण्यासाठी कुणाला तरी आपले वाटेकरी करण्याची केविलवाणी धडपड भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी करु नये असा सबुरीचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक यांनी दिला असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून परत गेलेल्या ४३ कोटी रुपयांच्या निधीबाबत आत्मचिंतन करण्याची खरी गरज आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा