शोधकार्यासाठी स्कुबा डायव्हींग पथकाची मदत घेणार
सावंतवाडी
माडखोल धरण परिसरात पार्टीसाठी गेलेल्या तरुणांपैकी पोहण्यासाठी उतरलेला युवक बेपत्ता झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी उशिरा उघडकीस आली होती. अर्जुन विश्राम पाताडे (१८, रा. न्यू खासकीलवाडा, सावंतवाडी ) असे त्याचे नाव आहे. याबाबत त्याचा सहकारी तेजस राऊळ (१८) याने पोलिसांत खबर दिल्यानंतर पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, धरणात बुडालेल्या या युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न गुरुवारी सकाळपासून सांगेलीतील बाबल अल्मेडा टीमकडून धरणाच्या पाण्यात शोध घेण्यात आला मात्र त्यांना अपयश आले. त्यामुळे शुक्रवारी स्कूबा डायव्हींग टीमच्या सहाय्याने शोध घेतला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, आपल्या मुलाला या दोघांतील एका मित्राने घराकडून नेले होते. त्यांनीच माझ्या मुलाचे काहीतरी बरेवाईट केले असावे असे सांगत अर्जूनच्या आईने घातपाताची शक्यता वर्तवली आहे. तसेच या दोन्ही युवकांची कसून चौकशी करण्याची मागणीही तिने पोलिसांकडे केली आहे. मात्र,अर्जुन चा शोध लागल्यानंतरच पोलीस याबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहे.
अर्जुन हा आपल्या दोन सहकारी मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी माडखोल येथील धरण परिसरात गेला होता. तेजस राऊळ व संकेत कामतेकर अशी त्या दोन मित्रांची नावे आहेत. यातील तेजस राऊळ याने पोलीसांना दिलेल्या फिर्यादीनुसार माडखोल धरण परिसरात ते तिघे जण बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पार्टी साठी गेले होते. त्यानंतर त्या ठिकाणी मौज माजा झाल्यानंतर दुपारी सावंतवाडी येथे येत जेवण पार्सल घेऊन पुन्हा माडखोल येथे जात जेवण केले. त्यानंतर सायंकाळी त्यां तिघांनीही पाण्यात पोहण्याचा निर्णय घेतला. धरणाच्या आउटलेटसाठी उभारलेल्या बंधाऱ्यावरून त्या तिघांनीही उडी घेतली. मात्र, अर्जुनला पोहता येत नसल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही व तो पाण्यात बुडाला.
काही वेळाने मित्र पाण्याच्या बाहेर आल्यानंतर त्यांना अर्जुन दिसून आला नाही. त्यामुळे त्या दोघांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सावंतवाडीत अर्जुन सोबत असलेल्या त्या युवकाने अर्जुन माझा मित्र आहे मी त्याचा शोध घेतो असे सांगत माडखोल येथील तेजस नामक युवकाला घरी पाठवले. मात्र, बराच वेळ शोध घेऊनही त्याला अर्जुन सापडला नसल्याने अखेर मागे राहिलेल्या संकेत याने आपल्या मोबाईलवरून १०० नंबरवर संपर्क करुन पोलीसांना माहीती दिली. मात्र, तो फोन थेट ११२ नंबरवर पुण्यात जोडला गेला व तेथून सिंधुदूर्ग कंट्रोल रुमला याबाबत कळविण्यात आले.
त्यानंतर सावंतवाडी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच सायंकाळी ७ च्या सुमारास पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संकेत हा तिथेच होता. त्याने पोलिसांना आपला मित्र पोहत असताना दिसेनासा झाला आहे असे सांगितले. मात्र, रात्र झाल्याने व परिसरात अंधार असल्याने त्या परिसरातील नागरिकांना सोबत घेत अर्जुन कुठे दिसून येतो काय याची पडताळणी पोलिसांनी केली. अखेर तो कुठेच दिसून न आल्याने पोलीस माघारी फिरले. त्यानंतर पोलिसांनी संकेत कामतेकर व घरी गेले ला दुसरा मित्र तेजस राऊळ याला सोबत घेत पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर तेजस राऊळ याने दिलेल्या फिर्यादी नुसार पोलीस ठाण्यात नापत्ताची नोंद करण्यात आली. त्यानंतर सोबत असलेल्या दोघा मित्रांना कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, गुरुवारी सकाळी पोलिस निरिक्षक शंकर कोरे, तहसिलदार राजाराम म्हात्रे, सहाय्यक पोलिस निरिक्षक आनंद यशवंते, डुमिंग डिसोझा, रुपेश नाईक, सतिश कविटकर, मनिष शिंदे आदींनी घटनास्थळी जात पाहणी केली. तसेच सांगेलीतील बाबल अल्मेडा टीमलाही पाचारण करण्यात आले. ही टीम घटनास्थळी दाखल होत त्यांनी बेपत्ता अर्जुन पाण्यात कुठे दिसून येतो का याची पाहणी केली. मात्र, त्यांना अपयश आले. त्यामुळे अखेर त्स्कुबा डायव्हिंग पथकाला बोलावण्यात आले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत स्कुबा डायव्हिंग पथक घटनास्थळी दाखल न झाल्याने शुक्रवारीसकाळी ९ वाजता स्कुबा डायव्हिंग पथकाला पून्हा पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या परिसरात एक दुचाकी आढळून आल्याची माहितीही पोलिसांनी दिली. तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनीही घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली.
धरण परिसरात येणाऱ्या अशा अतिउत्साही युवकांना रोखण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाकडून धरण परिसरात सुरक्षा रक्षक नेमण्यात आला होता. श्रीकांत राऊळ असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडेही पोलीसांनी चौकशी केली मात्र आपण असताना ते तिघेही युवक आपल्याला या ठिकाणी दिसून आले नाहीत. आपण सकाळी ९ वाजता या ठिकाणी येऊन दुपारी जेवणासाठी गेलो. त्यानंतर दुपारी ३ वाजता येऊन सायंकाळी ६ वाजता ड्युटी संपवून घरी गेलो. मात्र, यावेळी हे युवक आपणास दिसून आले नाहीत आपण गेल्यानंतर हे युवक ह्या ठिकाणी आले असावेत अशी माहिती दिली.
धरणावर सुरक्षारक्षक नेमूनही प्रकार सुरूच
माडखोल धरण परिसरात काही महिन्यांपूर्वी अशाच अतिउत्साहातून दोन युवक वाहून गेल्याचा प्रकार घडला होता. मात्र, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले होते. त्यानंतर स्थानिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात आला होता. मात्र असे असतानाही हे प्रकार सुरूच आहे. विशेष म्हणजे ह्या सुरक्षा रक्षकाची मुदत १७ नोव्हेंबर नंतर मुदत संपणार आहे. त्यानंतर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी त्या ठिकाणी कायम स्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.