संवादच्या पर्दापाश नंतर खाकी वर्दीचा वाढला हफ्ता
दोडामार्ग येथून नशीब आजमावण्यासाठी ओरोस येथे आलेल्या शक्तीकपूर फेम लाल पल्सरवर गॉगल लावून फिरणाऱ्या परत बाईक याला संवाद मीडियाच्या दणक्यानंतर समज देऊन मटक्याचा अवैध व्यवसाय बंद करण्यास लावला होता. जिल्हा पोलिस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या दिमाखात मटका घेणाऱ्या शक्तीकपूर परत बाईकने दिवाळीपर्यंत मटक्याचा व्यवसाय बंद केला होता, परंतु दिवाळी संपताच पुन्हा एकदा मोठ्या दिमाखात मटक्याचा अवैध व्यवसाय सुरू केला आहे.
संवाद मीडियाने परत बाईकच्या मटका व्यवसायाची आणि जमवलेल्या संपत्तीची पोलखोल केल्यानंतर त्याच्या व्यवसायावर गदा न आणता त्याचाच फायदा घेत खाकी वर्दीने मात्र आपला हफ्ता वाढवून घेतला आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या ठिकाणी आणि अत्यंत शिस्तीचे म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याच नजरेसमोर हे काय सुरू आहे? असा प्रश्न ओरोसच्या नागरिकांना पडला आहे. जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातून अनेक रुग्ण येतात, दाखल होतात आणि रस्त्यावर असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून परत बाईक याला मोठ्या प्रमाणावर मटका भेटतो. हे ग्रामीण भागातील लोक परत बाईक कडे मटका लावतात त्यामुळे तेच त्याचे मुख्य खेळी आहेत.
जिल्हा मुख्यालय येथे परत बाईकचे मटक्याचे चार स्टॉल आहेत. या स्टॉल वर परत बाईक दिवसाकाठी पाच ते सहा लाखांचा मटका घेतो, स्वतः घरी बसून मोबाईल वर देखील मटका स्वीकारतो. परत बाईक याची मुले देखील बापाच्या मटका इंडस्ट्री मध्येच काम करतात, त्यामुळे दरदिवशी लाखोंची उलाढाल परत बाईकच्या एकट्याच्या मटक्याच्या अवैध व्यवसायातून होते.
मटक्याच्या अवैध इंडस्ट्री मुळे दोडामार्ग मधून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या परत बाईकने दिवाळीत तब्बल अडीज किलो सोने खरेदी केले.. मोठमोठ्या कारखानदारांना जमणार नाही अशी खरेदी परत बाईक मटक्याच्या धंद्यावर करतो. ओरोसमध्ये असलेल्या स्वतःच्या इमारतीमध्ये त्याने भाडेकरू ठेवले असून स्वतःच्या मालकीच्या चार चारचाकी गाड्या आहेत. हायवेपासून दीड किलोमीटर अंतरावर परत बाईक ने स्वतः कवडीमोल दराने मोठी जमीन खरेदी केलेली असून खाकी वर्दीच्या आशीर्वादावर परत बाईक मालामाल झाला आहे. परत बाईक च्या अवैध मटका व्यवसायाची तक्रार खाकी वर्दीकडे झाली की खाकी वर्दीवालेच हफ्ता वाढवून घेत आपले भले करून घेतात, त्यामुळे जिल्ह्यात अवैध व्यवसायांना पेव फुटला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हद्दीतच खाकीचे शिलेदार आपले प्रताप दाखवत असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक परत बाईक वर काय कारवाई करतात की पुन्हा हफ्ता वाढीनेच प्रकरण शांत होते हेच पाहणे औत्सुक्याचे आहे.