You are currently viewing मनसे भरवणार “खड्ड्यांची यात्रा” –  परशुराम उपरकर

मनसे भरवणार “खड्ड्यांची यात्रा” –  परशुराम उपरकर

मालवण

मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरीही जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी मात्र निर्लज्ज सारखे वागत आहेत. त्यामुळे सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा निर्लज्ज कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी मनसेच्या वतीने मालवण आणि कुडाळच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो घेऊन प्रदर्शन स्वरूपात ढोल ताशांच्या गजरात खड्ड्यांची यात्रा भरवली जाणार आहे. यातून सत्ताधारी आमदार, खासदार, पालकमंत्री यांचे अपयश जनतेसमोर मांडले जाणार आहे, अशी माहिती मनसे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मालवण येथील शासकीय विश्रामगृह येथे परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद सांडव, विशाल ओटवणेकर, श्रीहरी खवणेकर आदी उपस्थित होते. यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत वेळोवेळी जनतेतून आवाज उठविला जातो. आंदोलने केली जातात. मात्र लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांवर राग काढण्याचे काम करतात. सत्ताधारी पक्षाचे जे सामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी निवडणुकीच्यावेळी जनतेला विकासकामे करण्याची आश्वासने लोकप्रतिनिधी मार्फत देतात त्याच पदाधिकारी व कार्यकर्ते यांना जनतेने रस्त्यात अडवून जाब विचारला पाहिजे. तर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी न झालेल्या कामांबाबत आपल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारला पाहिजे. मात्र आता लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांच्या भावना व प्रश्नांकडे पाठ फिरवतात. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी निर्लज्ज सारखे वागत आहेत, अशी टीका परशुराम उपरकर यांनी केली.

विकासकामांसाठी सत्ताधारी लोकप्रतिनिधी निधी आणू शकत नाहीत. तर आलेला निधी खर्च करायला आज अधिकारी नाहीत. बांधकाम विभागातील अधिकारी सर्वाला कंटाळून व्हीआरएस घेत आहेत. मालवण कुडाळ मध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनता वारंवार खड्ड्यांबाबत निवेदने देत आहे. मनसे ही सातत्याने आवाज उठवत आहे.मनसे मार्फत मालवण कुडाळ मधील खड्डेमय रस्त्यांचे फोटो काढून ढोल ताशांच्या गजरात खड्ड्यांची फोटो जत्रा भरवणार आणि आमदार खासदार पालकमंत्री यांचे अपयश जनतेसमोर आणणार. यासाठी कुडाळ येथे १० नोव्हेंबर रोजी व मालवणात ११ नोव्हेंबर रोजी मनसेची नियोजन बैठक घेऊन या आंदोलनाची रूपरेषा ठरवली जाणार आहे. या आंदोलनात जनतेनेही सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी उपरकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा