जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री सौ भारती महाजन-रायबागकर यांची काव्यरचना
आमच्यावेळेची मौजमजा आता काही येत नाही
आजकालच्या दिवाळीत पुर्वीसारखी गंमत नाही
कोण म्हणतं दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही?
कोण म्हणतं दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही?
दिवाळीच्या दिवसात आता जरी गुलाबी थंडी पडत नाही
पण तेव्हासारखीच उटणं आता, लावते आजची *बिझी* आई
अभ्यंगस्नान तसेच, रंगतेच रांगोळीची नक्षीही
कोण म्हणतं दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही?
लुकलुकणाऱ्या दीपमाळांची उंच भिंतीवर रोषणाई
नेत्रदीपक, रंगीबेरंगी, फटाक्यांची किती अपूर्वाई
आकाशकंदीलांच्या नानापरी, अंधारात तेवते पणतीही
कोण म्हणतं दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही?
रोजच पिझ्झा, पावभाजी, कधी आवड, कधी नाईलाज म्हणुन
आजही फराळाचं करतातच, स्त्रिया जिवापाड खपुन
अप्रूप आहे म्हणुनच ना? फराळाचे बॉक्स पाठवती परदेशीही
कोण म्हणतं दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही?
तऱ्हे तऱ्हेच्या कपड्यांनी असतो, वॉर्डरोब जरी भरलेला
कपडेलत्ते, सोने-चांदी, गाडी, फ्रीज, टीव्हीच्या खरेदीला
बाजारपेठ फुललेली, म्हणत, अबब! कित्ती ही महागाई!
कोण म्हणतं दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही?
कानठळी आवाज, फटाक्यांचा धूर, आपल्याला होतोच त्रास
रेडीमेड फराळाचे चवीने, कधी घ्यावे लागतात घास
चांगल्या बरोबर थोडेसे वाईट, सोसावे लागतेच काही
कोण म्हणतं दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही?
आता दिवाळी पहाट रंगते, कुठे सुमधुर गाण्यानं
एकमेकांना शुभेच्छा देतात, कुणी प्रत्यक्ष, फोन, संदेशानं
धामधुमीत या कुणी ठेवतो, याद उपेक्षितांचीही
तरी म्हणावं? दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही
कूर्मगतीचा काळ सरला, वेगवान जीवनशैली
उत्सवांच्या परी निराळ्या, उत्साहाची रीत बदलली
समृद्धीही असेल आता, काटकसरी जगणं नाही
म्हणुन का असं म्हणावं? दिवाळी पहाट रंगत नाही
तेव्हा तस्सं, नि आत्ता अस्सं, उसासे का टाकावे?
आनंदात साथ देऊन त्यांच्या, गेले ते दिन आठवावे
*आमच्यावेळी* म्हणत असतीलच ना? वडीलधारे आपलेही
पटलं तर नका ना म्हणु…दिवाळी पहाट रंगत नाही.
सौ. भारती महाजन- रायबागकर
चेन्नई
9763204334
७-११-२१.