सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक ठाकर लोककलेचा ठेवा जपणारे परशुराम विश्राम गंगावणे यांचा दिल्ली येथे पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.
आज सायंकाळी ५ वा. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल मध्ये देशातील विविध भागांतील पद्मश्री विजेत्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी येथील ठाकर कला आंगणचे संस्थापक परशुराम विश्राम गंगावणे यांच्या समावेशाने सिंधुदुर्ग चे नाव देशपातळीवर अधोरेखित झाले. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शहा, सविता रामनाथ कोविंद तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
या विजेत्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ७ जणांना पद्मविभूषण, १० जणांना पद्मभूषण तर १०२ लोकांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.