– आयपीएस सुब्रमण्य केळकर
सिंधुदुर्गनगरी
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विशेषत: युपीएससी परीक्षा देतांना प्रामाणिकपणे वृत्तपत्र वाचा. वाचनाची सवयच ध्येयाकडे नेते. बेसीक पुस्तकांबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका अभ्यासने आवश्यक आहे. यश मिळविण्यासाठी अभ्यासाचा प्रामाणिक प्रयत्न करताना प्लॅन बी हा देखील तयार हवा, असे मार्गदर्शन मूळचे जिल्ह्यातील चिंदर गावातील परंतु, सद्या तामिळनाडू येथे कार्यरत असणारे आयपीएस अधिकारी सुब्रमण्य भालचंद्र केळकर यांनी केले.
यूपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि प्रेरणा अंतर्गत आज आयपीएस अधिकारी सुब्रमण्य भालचंद्र केळकर यांचे फेसबुक लाईव्ह मार्गदर्शन झाले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सुरुवातीला प्रास्ताविक केले. त्याचबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनीही स्वागत करुन श्री. केळकर यांचे अभिनंदन केले.
श्री. केळकर म्हणाले, मराठी भाषेतून युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होता येते. खुप मुलांची निवड झाली आहे. ज्यांच इंग्रजी चांगल आहे त्यांनी इंग्रजीतून परीक्षा द्यायला हरकत नाही. परीक्षेचा अभ्यास करतांना स्वत:साठी प्रत्येक जण नोट्स काढत असतो. तुमचं कौशल्यं आणि वेगळंपण अशा नोट्स काढताना जपलं पाहिजे. इंग्रजी वृत्तपत्र आणि मराठी वृत्तपत्र यांचे वाचन करताना छोटे छोटे सारांश लेखन करायला हवे.
वैकल्पिक विषय निवड करताना त्या विषयांची तुमाला आवड हवी. जेणेकरुन समर्पण करुन अभ्यास करता येईल. त्याविषयाचे साहित्य उपलब्ध असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या विषयाचे मार्गदर्शन ही असायला हवे. एनसीईआरटीची पुस्तक वाचन खुप गरजेच आहे. कॉलेजची एन्जॉय करायची वर्ष देखील महत्वाची आहे. ती ती वर्ष त्या त्या वर्षी एन्जॉय करताना अभ्यासही महत्वाच आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना 2011 पासून च्या प्रश्नपत्रिका पाहायला हव्या. टेलीग्रामवर युपीएससी मटेरीअल, साहित्य उपलब्ध आहे. युट्युबवर देखील बरंस मार्गदर्शन उपलब्ध आहे. अभ्यासाचा प्रामाणिक प्रयत्न करताना काही गोष्टी आपल्या हातात नसतात. यश नाही मिळाल म्हणून खचून न जाता त्यासाठी प्रर्यायी मार्ग हवा, ज्या ज्या क्षेत्रात जे जे कराल ते उत्तम कराल. त्यासाठी प्लॅन बी तयार हवा असा मौलिक संदेश श्री. केळकर यांनी दिला.