Quora मराठी व्यासपीठावरील २०२१ सालातील तेरावे ‘सर्वोत्तम लेखक’ म्हणून विनय सामंत यांचे नाव जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. Quora मराठीच्या संपूर्ण परिवारातर्फे विनय यांचे अभिनंदन!
विनय यांनी आजवर Quora मराठी व्यासपीठावर ४८४ उत्तरे लिहिली असून १३१ प्रश्न विचारलेले आहेत. Quora इंग्रजी व्यासपीठावरही त्यांनी ९८ उत्तरे लिहिली आहेत. मराठी व्यासपीठावरील त्यांच्या मजकुराला १६.६ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. सामाजिक उद्योजकता, सविनय, मायबोली, कोरोना – पश्चात भटकंती, बागप्रेमी इ. मंचांचे ते ॲडमिन असून आयुष्य म्हणावे यालाचे नियंत्रक आणि अनेक मंचांमध्ये योगदानकर्ते म्हणून कार्यरत आहेत.
सांघिक खेळामध्ये सुरूवातीची आणि शेवटची फळी महत्त्वाची मानली जाते, पण त्यांच्यापेक्षा अदृष्य अशी सर्वात जास्त जबाबदारी ही मधल्या फळीवर असते. सुरूवातीच्या खेळाडूंनी नांगी टाकली किंवा चांगला खेळ केला तरी अनुक्रमे मधल्या फळीतील खेळाडूंना खेळ सावरावा लागतो किंवा त्यांच्यावर संघाला अधिक मजबूत स्थितीत ठेवण्याचे दडपण असते. म्हणून मधल्या फळीतील खेळाडू हा ऑलराऊंडर असावा लागतो. ‘कमी तिथे आम्ही’ पेक्षा ‘आम्ही आहोतच’ हीच भूमिका त्यांना अनेकदा निभावावी लागते. विनय सामंत हे त्याच मधल्या फळीतील खेळाडूंसारखे आहेत. विनय यांनी लिहिलेल्या उत्तरांवर उत्तरांखाली चर्चा झालेली नाही, अशी उत्तरे क्वचितच सापडतील. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची ओघवती लेखणी आणि आयुष्यातील विविधरंगी अनुभव. सर्वांच्या आवडत्या खाद्यपदार्थांपासून ते कोडिंगसारख्या किचकट विषयांवरील त्यांची उत्तरे फक्त अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहिलेली नसतात तर त्याला अनुभवांची जोड दिलेली असते.
स्टार्टअप, खाद्यपदार्थ, व्यवसाय मार्गदर्शन, मार्केटिंग, चित्रपट, संकेतस्थळं, कुटुंब, पालकत्व, राजकारण, शेती, अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयांमधील त्यांचा अभ्यास आणि अनुभव अचंबित करणारा आहे. विनय यांच्याकडे लोकांना नेमकं काय हवं आहे, हे हेरण्याची चांगली कला अवगत आहे. स्वत:च्या या कलेचा ते लोकांनाच फायदा करून देण्यासाठी फार उत्तम वापर करतात. विविध स्तरातील व्यक्ती, संस्था आणि सरकारसोबत काम करण्याच्या मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं असून त्यातून झालेलं ज्ञानार्जन अधिकाधिक लोकांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी त्यांची धडपड सुरू असते. Quora वरील त्यांची उत्तरे, मंचावरील माहिती व्यासपीठाचा दर्जा आणि विश्वासार्हता वाढविण्यामध्ये मोलाचं योगदान देत असतात.
विनय यांची उत्तरे आणि इतरांच्या उत्तरांवरील टिप्पण्या पाहता त्यांच्याकडे असलेला माहिता मोठा खजिना अद्याप सर्वांसमोर आलेलाच नाही, असे वाटते. चांगला लेखक सर्वात आधी चांगला वाचक असावा लागतो. विनय यांच्याकडे ते बारकावे टिपण्याची वृत्ती आहे. Quora व्यासपीठावर विषयाला आणि व्यक्त होण्याला बंधन नाही, त्यामुळे विनंय यांच्याकडून नेहमीच अधिकाधिक वेगळ्या माहितीची अपेक्षा वापरकर्त्यांना असते. या अपेक्षांवर ते खरे उतरतील याची आम्हाला खात्री वाटते.
विनय यांच्याविषयी…
विनय सामंत यांनी पेण येथील शासकीय तंत्रनिकेतनमधून मेकॅनिकलचा डिप्लोमा केला आहे. विनय यांना आयटी क्षेत्राचा २२ वर्षांचा अनुभव असून स्वत:ची सॉफ्टवेअर कंपनीदेखील आहे. डायनॅमिक वेबसाईट्स, वर्डप्रेस, द्रुपालसारख्या CMS, ERP & CRM मधे त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. मराठी संकेतस्थळ, मोबाईल ॲप्समधे त्यांनी विशेष काम केले आहे. २०१७ पासून महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचा अधिकृत डेव्हलपर म्हणून ते काम पाहत आहेत. मराठी आणि डिजिटल फ्युचर विषयावर भाषा प्रेरणा दिनानिमीत्त मंत्रालयाच्या प्रांगणात विशेष सत्रदेखील त्यांनी घेतले आहे. ‘मराठी विश्वकोश’ आणि ‘मराठी शब्दकोश’ ह्या दोन संकेतस्थळ व त्याचे मोबाईल ॲप त्यांनी स्वत: डिझाईन आणि कोडींग केले आहेत.
ह्या व्यतिरिक्त सेंद्रीय शेती व उर्जा संवर्धन क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे. इज्राईली तंत्रज्ञानावर आधारित सेंद्रीय उत्पादनाचे भारतात यशस्वी प्रत्यार्पणही त्यांनी केले आहे. गेली १० वर्षे नारळ, काजू आणि सामाजिक उद्योजकता क्षेत्रात अभ्यास आणि काम सुरु आहे. विविध विषय घेऊन इज्राईल, तुर्कस्थान, केनिया, युगांडा, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, कंबोडिया, नायजेरिया ह्या ९ देशांमधे त्यानी आजवर प्रवास केला असून केनिया व नायजेरियामधे स्वत:ची कंपनी देखील चालू केली होती. नायजेरीयामधे काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या क्षमता निर्माण प्रकल्पावर नायजेर राज्य सरकारच्या सहकार्याने विशेष काम त्यानी केले आहे. नायजेरीयाच्या “बिडा” परगण्याचे राजे “हिज हायनेस इट्सू नुपे” ह्यांच्याकडून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला असून त्यांनी कुडाळ येथे येऊन विनय यांची भेट घेतली आहे.
विनय यांना बुद्धीबळाची आवड असून मुलाबरोबर खेळणे, गोष्टी सांगणे. चमचमीत पदार्थ खाणे, तयार करणे, इंग्रजी चित्रपट आणि कार्टून पाहायला त्यांना आवडतं.
Quora मराठी’विषयी विनय म्हणतात की;
Quora मराठीवर पहिल्यांदा आलो सप्टेंबर २०२० च्या थोडं आधी. पूर्वी इंग्रजी Quora वर काही उत्तरे दिली आहेत. २०१७ मधे ॲक्टीव्ह होतो. नंतर तो पृथ्वीचा आयकन दाबून आलो मराठीवर आणि इंग्रजीवर परत गेलोच नाही. “नरेंद्र मोदींच्या सरकारचा खाजगीकरणावर का जोर आहे? याने देश विकला जाईल अशी भीती निर्माण होत आहे. तुम्हाला काय वाटते?” ह्या प्रश्नावर पहिले उत्तर दिले आणि संमिश्र पण छान प्रतिसाद मिळाला. त्यानंतरच्या काही उत्तरांमध्येच Quora वर “कुंभके मेले में बिछडा परिवार” परत मिळाला की काय, असे छान फिलिं होते. त्यानंतर Quora वर प्रत्यक्ष अनुभव, जसे आहेत तसे लिहायला सुरूवात केली. ते लोकांना खूपच आवडले. अनेक टिपण्या मिळायच्या. लोक अधाशासारख्या पोस्ट वाचायचे आणि भरभरून कौतूक करायचे. खरंच सांगतो, लोक म्हणतात मुठभर मांस चढते, पण माझे वजन ६-७ किलोने तरी वाढले Quora मुळे. ‘बाबामामा’चे उत्तर, RCM चे उत्तर, पॉवर सेव्हरचे उत्तर ह्याची अनेकांनी पारायणे केली. अनेक पर्सनल मेसेजेस, लोकांनी व्हाट्सऍप नंबर मिळवून संपर्क केलाय, फेसबुकवरून केलाय. नायजेरीयाच्या उत्तराचे अभिवाचन केलेय काही जणांनी. इतके प्रेम मिळाले वाचकांचे की Quora चे व्यसनच लागले. आजही बसलो की ३-४ तास तरी उठत नाही. सारी कामे बाकी राहतात. बायको किटकिट करते, पण लक्ष देत नाही. एक महिनाभर रोज पूर्णवेळ Quora वर लिखाण करायची इच्छा आहे. उत्तरे, पोस्ट, कमेंट, वाचन जमेल ते सारे. बहुतेक पुढील मॉन्सूनला हे करणार – “One Month Quora Unleashed”. Quora वरील माझे लेखन एका प्रकाशकाला देखील आवडले आहे. हे सारे लेख घेऊन मला एक पुस्तक प्रकाशित करायचे आहे. बघूया कसे जमते.
Quora वर जाणवलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इकडे वाचक स्टारडमला फॉलो करत नाही. फेसबुक, ट्विटर, इंस्टावर लोक स्टार्सना फॉलो करतात. त्यांचेच लेख, ट्विट फॉरवर्ड करतात. कितीही बकवास असले तरी. फोटो लाईक करणे आणि शेअर करणे तर कॉमन आहे. ही फालतूगिरी Quora वर होत नाही. Quora वर लोक विचारांना फॉलो करतात. अनेक ठिकाणी गट आहेत, विशिष्ठ विचारसरणीबाबत आग्रही लोक आहेत, पूर्वग्रहदूषित देखील आहेत. पण तरी देखील Quora वर आदरयुक्त वर्तणूक असते आणि योग्य विचारांना सर्व गटांमधून पाठिंबा मिळतो. माझी अनेक उत्तरे संघ/भाजप/मोदी विरोधी असतात, मला शरद पवारांचे खूप कौतूक आहे तरी माझे अनेक संघ/भाजप प्रेमी मित्र आहेत. ते नेहमी माझा उत्तरांवर कमेंट करतात, लाईक करतात. हे परस्पर सामंजस्य खूपच छान आहे जे कुठल्याच दुसऱ्या सोशल प्लॅटफॉर्मवर अनुभवायला मिळत नाही. हे पाहता मी एक अनोखा प्रयत्न करायचे ठरवले. “सोशल एंटरप्रेनरशिप” म्हणजेच “सामाजिक उद्योजकता”! समाजाने मिळून करायची म्हणून सोशल आणि सोशल मीडियावर जन्माला आली म्हणूनही सोशल. हे सारे खूपच वेगळे होते. अशा प्रकारची कुठलीही कंपनी अस्तित्वातच नाही. कसे बरे जमणार. पण Quora खरंच समविचारी लोकांचे नेटवर्क तुम्हाला देतं. ही कंपनी फॉर्म झाली. हे सारे केवळ Quora वर शक्य आहे कारण इथे समविचारी लोकांचा ग्रुप बनतो.
विनय यांनी लिहिलेली काही उल्लेखनीय उत्तरे खालीलप्रमाणे;
सॉफ्टवेअर अभियंता म्हणून तुम्ही विकसित केलेला सर्वात चांगला ‘अल्गोरिदम’ (algorithm) कोणता? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
माणसाची परिस्तिथी बदलायला वेळ लागत नाही याची काही उदाहरणे आहेत का? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
कमी किंमत दिला जाणारा चांगला प्रोग्रामिंग सराव कोणता आहे? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
एमपीएससी खरंच मायाजाल आहे का? तुमचा अनुभव कसा आहे? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
नोकरीपेक्षा व्यवसाय चांगला की शेती? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
तुम्ही व्यावसायिक कसे बनलात? तुम्ही तुमचे सुरुवातीचे अनुभव शेअर करू शकता का? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
माझ्याकडे 16 लाख रुपये आहेत. महिन्याकाठी 20-25 हजार उत्पन्न मिळण्यासाठी ते कशामध्ये गुंतवणे अपेक्षित आहे? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
गाव पाझर तलाव, बंधाऱ्यातील मत्स्य व्यवसाय व सखोल माहिती मिळेल का? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
स्टार्टअप कोणत्या महत्त्वाच्या घटकामुळे यशस्वी किंवा अयशस्वी होतो? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
मुलांमध्ये संशोधक वृत्ती कशी जोपसावी? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
काही लोक मांसाहार न करण्याचे कारण जीव हत्या मानतात. तर मग शाकाहारी लोक झाडांना मारतात, ही देखील जीव हत्या नाही का? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
केनियाने भारताला 12 टन खाद्यपदार्थ दिले. यावर आपले काय मत आहे? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
लहानपणापासून इंग्रजी माध्यामात शिक्षण घेणाऱ्या मुलास मराठी वाचनाची आवड कशी निर्माण करावी? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
पालकांच्या कठोर स्वभावाचा तुम्हाला फायदा झाला की तोटा? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन भारतात का बनत नाही? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
काही लोक मांसाहार न करण्याचे कारण जीव हत्या मानतात. तर मग शाकाहारी लोक झाडांना मारतात, ही देखील जीव हत्या नाही का? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
तुम्ही सुरू केलेल्या व्यवसायाचा तुमचा प्रवास शुन्यापासून ते आजपर्यंत सांगाल का? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
भारतात सुरू असलेल्या नेटवर्क मार्केटिंग, पिरॅमिड स्कीम व मल्टी लेव्हल मार्केटिंग अशा कंपन्यांमधून खूप फसवणूक केली जाते. यावर कारवाई करता येते का? त्यासाठी कोठे तक्रार केली पाहिजे? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
खेडे गावात आपण मटेरियल आणून देऊन 1200 sq ft बांधकामास किती खर्च येईल याचा तपशील द्याल का. जागा आपली आहे, त्यानुसार येणारा खर्च किती लागेल.? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
तुमच्या कोणत्या यशाचा तुम्हाला सर्वात जास्त अभिमान आहे? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या दिवसाच्या निमित्ताने मराठी भाषेचे काही वैशिष्ट्ये सांगू शकता का? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
आपल्या स्वर्गवासी झालेल्या जवळच्या नातेवाईकाच्या नावे मराठी शाळा किंवा माध्यमिक शाळेत गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस/शिष्यवृत्ती सुरू करण्याची माझी इच्छा आहे. पात्र विद्यार्थी निवडीसाठी अभिनव कल्पना सुचवाल का? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
बागकामाकरिता ‘कोकोपीट’ खरेच इतके प्रभावी आहे का? अथवा, हा ऑनलाइन विपणनाचा फसवा प्रकार आहे? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
मध्यमवर्गीय व्यक्तीचे व्यवसायापेक्षा नोकरी करण्याकडे कल का असतो? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
‘व्हाईट हॅट ज्युनिअर ॲप’वरून कोडिंग शिकल्यावर खरंच ॲप बनवता येतं का? चे विनय सामंत (Vinay Samant)ने दिलेले उत्तर
Quora मराठी व्यासपीठ आणि मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणा-या विनय सामंत यांचे हार्दिक अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!