You are currently viewing प्राधिकरणातील स्मशानभूमीस संरक्षक भिंत बांधण्यात येणार…

प्राधिकरणातील स्मशानभूमीस संरक्षक भिंत बांधण्यात येणार…

स्मशानशेड हलविण्याबाबतही होणार कार्यवाही

– अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी

सिंधुदुर्गनगरी : 

कोविडचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कोरोना मुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह प्राधिकरणातील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्याविषयी निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणी आज अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी सदर स्मशानभूमीची पाहणी करुन ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. यामध्ये प्राधिकरणातील स्मशानभूमी परिसरास संरक्षक भिंत बांधण्यात येणार असल्याचे व स्मशानशेड हलविण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे श्री. जोशी यांनी सांगितले.

       या वेळी कुडाळच्या उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे, उपअधिक्षक एस.बी. गावडे, कुडाळचे तहसिलदार अमोल पाठक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता व्ही.व्ही. जोशी, ओरोस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.पी. पवार, ओरोसच्या सपरंच प्रिती देसाई, ग्रामपंचायत सदस्य अमित भोगले, लक्ष्मीकांत परब, अनंतराज पाटकर, ग्रामस्थ मधुमालती चव्हाण, नागेश ओरोसकर, पांडुरंग मालवणकर, महेश परब, अपर्णा रासम, रोमी फर्नांडिस आदी उपस्थित होते.

       यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी सर्व प्रथम कोविड मृतदेह व त्याचा प्रसार होऊ नये म्हणून मृतदेहाचे अंत्यसंस्कार याबाबतचे महत्व उपस्थितांना पटवून दिले. तसेच ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या मुद्दयांवर पर्याय सुचवले. त्यामध्ये कोविडने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या मृतदेहाचा अन्य कोणालाही, समाजात प्रसार होऊ नये या उद्देशाने व प्रवास टाळण्याच्या उद्देशाने सदर स्मशानभूमी वापरण्यात येत आहे. त्यामुळे त्यास विरोध करू नये व शासकीय कामात अडथळा आणू नये व प्रशासनास सहकार्य करावे असे सांगितले. तसेच ठेकेदारांने आवार निर्जंतुकीकरणासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमावा, सायं. 4.00 ते रात्री 8.00 या वेळेतच मृतदेह दहन करावे, जिल्हा रुग्णालयाने प्रथम प्राधिकरणास माहिती द्यावी व त्यानंतर प्राधिकरणाने ठेकेदार व पोलीस यांना पुढील कार्यवाही करण्यास सांगावी, याबाबत नोंदवही अद्ययावत ठेवावी, स्मशानशेडकडे लाईट व विद्युत दाहिनी बाबत प्राधिकरण बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे अपर जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी व सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणचे सचिव मंगेश जोशी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा