You are currently viewing ” त्या गोड आठवणी “

” त्या गोड आठवणी “

  • Post category:लेख
  • Post comments:1 Comment

*जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ ज्योत्स्ना तानवडे यांचा दिवाळीतील आठवणी सांगणारा अप्रतिम लेख

‘आठवणीतली दिवाळी’ म्हटल्याबरोबर मनात असंख्य आठवणींची सुदर्शन चक्रे, भुई चक्रे, फिरू लागली. फुलबाज्या तडतडू लागल्या आणि असंख्य सुखद क्षणांची सोनफुले उधळत झाडे उंच उडू लागली. किती सुंदर होते ते दिवस.
माझे माहेर म्हणजे छोटेसे तालुक्याचे गाव. गावापासून काही अंतरावर मुख्य रस्त्यालगत पण शेतात अशी आमची वस्ती होती. आम्ही, काका, शेतात काम करणारे गडी यांची घरे होती.
दिवाळीपूर्वी घराची रंगरंगोटी होई. दारापुढचे अंगण सारवून स्वच्छ केले जाई.आई अतिशय सुंदर ठिपक्यांच्या रांगोळ्या घालायची.मोठे अंगण असल्याने आम्ही प्रत्येकीने रांगोळी काढायची असा दंडक होता. सर्वांच्या वरती ठळक रेषेत वडील ॐ, श्री, स्वस्तिक अशी शुभचिन्हे रेखाटायचे. मग आम्ही रंग भरायचो.अंगण एकदम खुलून यायचे.
गावामध्ये बरीच आधी वीज आली होती. पण आमच्या वस्तीवर १९७०च्या सुमारास वीज आली. त्यामुळे रोज कंदील लावायचो. दिवाळीत मात्र भरपूर पणत्यांची आरास असायची. पुढचे, मागचे अंगण, पायऱ्या, तुळशी वृंदावन उजळून उठायचे. घर एकदम प्रकाशमान व्हायचे.
दिवाळी आणि किल्ला यांचे समीकरणच असते. आम्ही भावंडे मोठा किल्ला बनवायचो. त्यावर मोहरी पेरून छान हिरवळ उगवायची. शिवाजी महाराज, मावळे, प्राणी अशी खूप चित्रे होती. वाई हे आजोबांचे गाव. तिथे ही चित्रे खूप छान मिळायची. संध्याकाळी रांगोळी घालून, चित्रे मांडून किल्ला सजवणे एक मोठे आनंददायी काम असायचे. एकदा गडबडीत महाराजांचे चित्र तुटले गेले. तर भावाने सिंहासनावर ‘महाराज लढाईवर गेले आहेत’ असा बोर्ड लावला. सगळ्यांनी त्याच्या समय सूचकता कौतुक केले. एकूणच ती मजा काही औरच होती.
दिवाळीचे मुख्य आकर्षण म्हणजे फराळाचे जिन्नस. आतासारखे हे पदार्थ बारा महिने बनवत नव्हते. विकतही मिळत नव्हते. सर्व पदार्थ आई घरीच बनवायची. तेही जात्यावर पीठ दळून. दिवाळीपूर्वी बरेच दिवस आधी तिची तयारी सुरू व्हायची. माझी आई साक्षात अन्नपूर्णा होती. तिच्या हातच्या चकल्या ,चिवडा, अनारसे, शंकरपाळी, चिरोटे अतिशय चविष्ट, खमंग, खुसखुशीत असायचे. नुसत्या आठवणीनेही तोंडाला पाणी सुटते, जिभेवर चव रेंगाळू लागते. त्यावेळी एकमेकांकडे फराळाची ताटे दिली जात. आलेल्या ताटात परत आपले फराळाचे दिले जाई. आई-वडिलांचा लोकसंग्रह खूप मोठा होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फराळाचे केले जाई.आईचे फराळाचे पदार्थ खाण्यासाठी काही जण आवर्जून घरी येत असत. जेवतानाची श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम, गोड पोळ्या, खिरी ही पक्वान्ने आई घरीच बनवायची.श्रीखंडाचा चक्काही घरीच बनवला जाई.या खास पंगतीची गोडी न्यारीच असायची.
त्यावेळी शेतात थंडी पण बरीच असायची. त्यामुळे कोणी आधी आंघोळीला जायचे यावर भावंडांची चर्चा सुरू व्हायच्या. चुलीवर गरम पाण्याचा हंडा तयार, तेल उटणे लावून अभ्यंगस्नानाचा थाट असायचा.
प्रत्येक दिवशी साग्रसंगीत पूजा व्हायची. दिवाळी स्पेशल नव्या कपड्यांचे खास आकर्षण असायचे.हे कपडे घालून देवाच्या दर्शनाला जायचे. मोठ्यांचे आशीर्वाद घेणे, सर्वांना शुभेच्छा देणे-घेणे यात दिवाळी आनंदात साजरी व्हायची. आज हे सर्व आठवताना मनामध्ये त्यांच्या स्मृतींनी फेर धरला आहे.आई- वडिलांच्या आठवणींनी मन भावूक झाले आहे. पुन्हा त्या दिवाळीची अनुभूती येते आहे.मग उगाच वाटून गेलं, खरंच ते दिवस पुन्हा कधी येतील का?

ज्योत्स्ना तानवडे. पुणे

This Post Has One Comment

  1. डॉ जी आर जोशी

    छान

प्रतिक्रिया व्यक्त करा