You are currently viewing जनता कर्फ्यू आवश्यक, पण जीवनावश्यक सेवा सुरू ठेवा – अनंत पिळणकर

जनता कर्फ्यू आवश्यक, पण जीवनावश्यक सेवा सुरू ठेवा – अनंत पिळणकर

कणकवली:

शहर, तालुका आणि जिल्ह्याच्या विविध भागात लागू असलेल्या जनता कर्फ्यूला आमचा विरोध नाही, राष्ट्रवादी नेहमीच जनतेसोबत आहे. मात्र जनतेने स्वतःहून पाळलेल्या या कर्फ्यूत प्रशासनाचा हस्तक्षेप नको, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचे मत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान अत्यावश्यक सेवेतील मेडिकल, रेशनिंग दुकान, हॉस्पिटल, भाजी आणि दूध विक्री सुरु राहिली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव, राष्ट्रवादी कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर आदी उपस्थित हिते.
शासनाच्या जनता कर्फ्यूला जेवढा प्रतिसाद मिळाला नाही त्याहीपेक्षा या जनतेने घोषित केलेल्या कर्फ्यूला मिळाला आहे. तेव्हा प्रशासनाने जनतेला सहकार्य करण्याची गरज आहे. शिवाय या जनता कर्फ्यूच्या नावाखाली अत्यावश्यक सेवेतील शासकीय आणि सार्वजनिक आस्थापना सुरु राहिल्या पाहिजेत अन्यथा राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही अनंत पिळणकर यांनी यावेळी दिला आहे. मेडिकल, रेशनिंग दुकान, हॉस्पिटल, भाजी आणि दूध विक्री हि सुरु राहिली पाहिजे. या आस्थापनेतील लोकांना कोणी दमदाटी करत असेल तर राष्ट्रवादी गप्प बसणार नाही असेही अनंत पिळणकर यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूची गरज आहे. जनतेच्या या भूमिकेला आमचा कायम पाठींबा आहे. मात्र कणकवली सारख्या अनेक शहरात जनता कर्फ्यू लागू असताना या कार्फ्युत सार्वजनिक आणि सरकारी आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवेतील आस्थापना बंद असल्याने सामान्य माणसाचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे या अस्थापना तत्काळ सुरु करण्यात याव्यात अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जर का अत्यावश्यक सेवेतील या लोकांवर कोणी जबरदस्ती करत असेल तर राष्ट्रवादी नेहमीच त्यांच्यासोबत असेल असेही अनंत पिळणकर म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादीच्या कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर यांनीही आपली भूमिका मांडली. ते म्हणाले राष्ट्रवादी कॉंग्रेसने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. जनता कर्फ्युत येथील शेतकऱ्यांच्या कृषी मालावर कोणताही परिणाम होता नये. शिवाय आता भातकापनीची कामे सुरु होतील तेव्हा शेतकऱ्यांना शेतीची साधने आवश्यक आहेत. या काळात शेतकऱ्यांना जे काही पाहिजे ते उपलब्ध होईल याची खबरदारी प्रशासनाने घेतली पाहिजे असे मत समीर आचरेकर यांनी मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा