You are currently viewing सावंतवाडी शहरातील दुहेरी हत्याकांड

सावंतवाडी शहरातील दुहेरी हत्याकांड

खून सोन्यासाठी की प्रॉपर्टीसाठी?

संपादकीय

सावंतवाडीत उभाबाजार येथील निलिमा नारायण खानविलकर (८०) व त्यांच्याकडे सोबत म्हणून झोपण्यासाठी येणारी शालिनी शांताराम सावंत (७५) या दोन्ही वृद्ध महिलांचा खानविलकर यांच्या जुन्या राहत्या घरात निर्घृणपणे खून करण्यात आला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घडलेल्या दुहेरी खून प्रकरणाने सावंतवाडी शहर हादरले आहे. सावंतवाडीत गेल्या काही महिन्यांपूर्वी सबनिसवाडा येथे दागिन्यांसाठी झालेल्या एस.टी. मेकॅनिक ठाकूर यांच्या खुनानंतर घडलेली ही दुसरी घटना आहे. त्यामुळे सावंतवाडी पोलिसांसमोर या खुनाचा तपास लावणे आव्हानात्मक आहे. ओरोस येथून रेम्बो श्वान आणून आरोपीचा माग घेण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी भेट देत खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी खुन्याचा तपास लवकरच लागेल असे म्हटले आहे. घडलेली घटना पाहता खूनी व्यक्ती माहितगार असावी असा अंदाज येतो. गुन्हा घडला तिथे एक्सपरटो बेकरीची भट्टी आहे, जिथे उशिरापर्यंत काम चालते, पहाटे लवकर उठून बेकरी कामे सुरू होतात, तरीही शेजारच्या घरात खुनासारखा गुन्हा घडतो म्हणजे आश्चर्य. रस्त्यावरच असलेल्या मोडकळीस आलेल्या या घरात दोन म्हाताऱ्या महिला एकट्या राहतात हे जरी खुन्याला माहिती असलं तरी त्यांच्या अंगावरील दहा/वीस ग्रॅम सोन्यासाठी कोणी खून करेल का? चोर चोरी करण्याच्या उद्देशाने आला तरी सहजरीत्या म्हाताऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने घेऊन पळून जाऊ शकला असता, परंतु तसे न करता गळे चिरून खून केला म्हणजे चोरी एवढाच खुन्याचा उद्देश नव्हता असं म्हणायलाही वाव आहे.

प्रॉपर्टीसाठी खून झाला का?
खानविलकर ही महिला एकटीच होती तिला मुलं वगैरे नव्हती, तर तिचा भाचाच सर्व खर्च करायचा व भाच्यालाच ही प्रॉपर्टी दिली होती अशी माहिती त्याठिकाणी असलेल्या एका माहितगार व्यक्तीने दिली आहे. त्यामुळे प्रॉपर्टी हा मुद्दा असेल तर आणखी कोणी प्रॉपर्टी मध्ये भागीदार, नातेवाईक होते का? किंवा प्रॉपर्टी भाच्याला दिली असली तरी ती खानविलकर यांनी गेली कित्येकवर्षं कोणालाही डेव्हलपमेंटसाठी का दिली नाही? किंवा घराची असलेली अवस्था पाहता दहा बारा गुंठे भर शहरातील प्रॉपर्टी अशीच भिजत घोंगड का ठेवली? असेही प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे खानविलकर यांची प्रॉपर्टी नक्की कोणाला दिली? त्या जिवंत असेपर्यंत त्या प्रॉपर्टीचा कोणाला लाभ घेता येत नव्हता का? की प्रॉपर्टी साठी आणखी कोणाचे वाद होते? याबाबाबत खोलवर तपास होणे आवश्यक आहे.
घटना स्थळी श्वान आणून माग काढण्यात आला, परंतु सध्याच्या डिजिटल युगात सर्रास सर्वांकडे मोबाईल असतात, त्यामुळे सदरचा एरियामध्ये त्या काळात आलेल्या व्यक्तींचे मोबाईल नंबर ट्रेस होतात का? याबाबत देखील माहिती घेतली असता तपास करणे सोपे होऊ शकते. सावंतवाडी शहरात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. “तेरी भी चूप मेरी भी चूप” अशाप्रकारे दारू, गांजा सारखे अवैध व्यवसाय तेजीत सुरू झाले आहेत. मीडियामध्ये, सोशल मीडियावर अनेकांनी लिखाण करून पोलिसांनी याबाबत गांभिर्याने पहावे यासाठी प्रयत्न केले आहेत. सावंतवाडी शहर परिसरात भर दिवसा आपल्या दुचाकी गाड्यांमध्ये दारूच्या बाटल्या भरून विक्री करणारे अनेक युवक आहेत. आज खुनाची घटना घडली त्याच परिसरात गुप्त माहिती घेतली असता दारूचे अवैध व्यवसाय कोण करतात याचीही माहिती मिळू शकेल. कारण सदर घडलेला खुनाचा गुन्हा गांजा, दारू सारख्या व्यसनांमुळे सुद्धा घडू शकतो. आजची पिढी नोकरीच्या मागे न धावता झटपट पैसा मिळविण्यासाठी दारू, गांजा विक्री सारख्या अवैध व्यवसायात अडकत चालली आहे, त्यामुळे व्यसनाधीन होऊन देखील अशाप्रकारे कृत्य अनावधानाने घडू शकते याकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही.


सावंतवाडी शहर हे ऐतिहासिक, सौंदर्याने नटलेले एक सुंदर शहर म्हणून ओळख असलेलं शहर भविष्यात गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायासाठी ओळखले जाऊ नये अशीच सावंतवाडीच्या प्रत्येक सुजाण नागरीकांची इच्छा असेल. सावंतवाडी पोलिसांनी सावंतवाडीत घडत असलेल्या गुन्ह्यांना प्राथमिक स्वरूप असतानाच गंभीरपणे घेऊन तात्काळ कारवाई करावी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी देखील जातिनिशी लक्ष घालून अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा हात हातातून निघून जाईल आणि मागाहून पश्चाताप करून काहीच उपयोग होणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा