You are currently viewing सर्वसामान्यांची दिवाळी गोड करावी

सर्वसामान्यांची दिवाळी गोड करावी

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची मागणी

वैभववाडी

सध्याच्या सरकारने कोरोनामुळे त्रस्त झालेल्या कुटुंबांना स्वस्त रेशन दुकानातून मूलभूत व अत्यावश्यक गहू, तांदूळ, तेल, तूरडाळ, हरभराडाळ, रवा, मैदा व साखर या वस्तू दिवाळीपूर्वी पुरवाव्यात आणि सर्वसामान्यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे.
सरकारचा आधार असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये आहे. सरकारच्या माध्यमातून आताच भरीव असे नियोजन होणे गरजेचे आहे. सरकारने ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून द्याव्यात असे निवेदन ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने मा.जिल्हा पुरवठा अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे मेलद्वारे केले आहे. या निवेदनाच्या प्रती मा.मुख्यमंत्री, मा.अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री, मा.पालकमंत्री, सिंधुदुर्ग, मा.जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग, मा.प्रांताधिकारी व मा.तहसीलदार यांना पाठविण्यात आल्या आहेत. गेली दोन वर्षे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पारंपारिक दिवाळी सारखे सण उत्सव साजरे करता आले नाहीत. दोन-तीन वर्षापासून कोरोनामुळे अनेकांच्या घरातील कर्त्या व्यक्तींचे निधन झाल्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. गावोगाव शहरी भागासह ग्रामीण भागातील नाते-गोते दुरावले गेले. प्रत्येक कुटुंबाला दवाखान्याच्या बिलासाठी आर्थिक संघर्ष करावा लागला आहे. जवळपास ७० ते ८० टक्के कुटुंबे आजही कर्जाच्या खाईत डुबलेली आहेत. दोन वर्षे कोरोनाचा वाढता प्रभाव,तोक्ते वादळ व अतिवृष्टीमुळे शेतकरी, कामगार, मजुरांना जगणे मुश्किल झाले आहे. सध्याच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य वर्ग मेटाकुटीला आला आहे. त्यांना दररोजचे जीवन जगणे देखील अवघड झाले आहे. त्यामुळे सरकारने या गरीब सर्वसामान्य घटकाला गावोगाव स्वस्त रेशन दुकानातून मूलभूत व अत्यावश्यक गहू, तांदूळ, हरभराडाळ, रवा, मैदा व साखर या वस्तू दिवाळीपूर्वी पूरवाव्यात अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा