You are currently viewing कृषि उन्नती योजनेंतर्गत कृषि यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु….

कृषि उन्नती योजनेंतर्गत कृषि यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु….

सिंधुदुर्गनगरी

राज्यात कृषि यांत्रिकीकरण उपअभियान योजना सन 2014-15 पासून राबविण्यात येत आहे. सन 2020-21 करीता कृषि यांत्रिकीकरण योजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंमलबजावणी करिता राज्यशासनाचे mahadbtmahait.gov.in हे पोर्टल कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची नोंदणी व अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती याबाबतची माहिती पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना या सदराखाली देण्यात आली आहे. अशी माहिती विभागीय कृषि सह संचालक, कोकण विभाग यांनी दिली आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व कृषी अवजारे निवडीसाठी उपलब्ध राहतील. ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक आणि महिला शेतकऱ्यांना किंमतीच्या 50 टक्के किंवा 1.25 लाख याप्रमाणे अनुदान मर्यादा राहील. इतर अवजारांसाठी केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार घोषित केल्याप्रमाणे अनुदान मर्यादा राहील. केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थांकडून तपासणी केलेल्या ट्रॅक्टर, पॉवर टिलर अवजारांची यादी या पोर्टल वर वेळोवेळी अद्ययावत करण्यात येते. या यादीमध्ये समाविष्ट असलेली किंवा ट्रॅक्टर, पॉवर टिलर वगळता इतर औजारांच्या बाबतीत केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त तपासणी संस्थेकडील वैध तपासणी अहवाल उपलब्ध असलेल्या अवजारांना अनुदान अनुज्ञेय आहे.
या उपअभियानांतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांचे अर्ज राज्यशासनाच्या mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. लाभार्थी निवड सोडत पध्दतीने करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्ज भरल्याची पावती जपून ठेवावी. अर्ज सादर करताना 7/12, 8 अ दाखला, खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त तपासणी संस्थेकडील वैध तपासणी अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक प्रत, जातीचा दाखला (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती), मोबाईल क्रमांक आदि कागदपत्रे आवश्यक आहेत.
या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषि सह संचालक, कोकण विभाग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा