जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सदस्य ज्येष्ठ लेखक, कवी, गझलाकार श्री अरविंदजी ढवळीकर यांनी संगीतकार,कवी यशवंत देव यांच्या स्मृती जागृत करत ३० ऑक्टोबर या त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांना वाहिलेली शब्दसुमनांजली (१ नोव्हेंबर हा यशवंत देव यांचा जन्मदिन)
होय करूणा वराच,, तुम्ही यशवंत तर होताच आणि आम्हा सारख्या संगीत रसिकांचे देव ही होता तरीही करुणा वहिनींच्या तुमच्या जीवनातील प्रवेश आणि स्पर्श हा जिथे गाभारा तेथेच कळस हेच सिद्ध करून गेला हे मला ठाऊक आहे म्हणूनच मला तुम्हाला करूणा वरा
असेच म्हणायला आवडेल आणि तुम्हालाही ते आवडलं असतं
एक दिवस असा आला
कसं जगायचं शिकवून गेला
कधी आपल्या घडल्या भेटी
गीत मोहरुन गेला ओठी ।।
हीच किमया होती तुमची
कोटी कोटी रुपे स्वरांची
दिवस माझे फुलवून गेली
झोपाळ्या विण झुलवुन गेली ।।
संगीत वसंत घडी जीवनी
अशीच राहो सांगून गेला
या जन्मावर तुम्हीच शतदा
प्रेम करावे शिकवून गेला ।।
असोत केल्या लाख चुका पण
प्रेम सूरां वर तुमच्या केले
गीत तुझे अन गाण्यासाठी
सूर सदैवच लागून गेले ।।
शोधू कुठे कशास काशी
काय मागणे मला कुणाशी
हृदयातच भगवंत आजही
गीत ऐकण्या असे उपाशी ।।
कुणी जाल का सांगावया
तू उघडी नयन शंकरा
करूणा करा करुणा वरा
रे परतवी स्वरभास्करा ।।
अशी संपते का कधीही
सुरु होण्या आधी कहाणी
साक्षीला ठेवून केवळ
ओठी गाणी नयनी पाणी ।।
नका च बोलू कधी ही आता
विसरशील खास मला
दृष्टी सृष्टी आड कुठे तव
स्मृती ठेवुनी का हो गेला ।।
अमरत्वच त्या कसा निरोप
स्वरपंजरी हा भीष्म निजून
उत्तरायणास आमुच्या
वेळ पुरती ना अजून ।।
ओशोंचा ध्यास तूच
करुणेचा श्र्वास तूच
अखेरचे शब्द हेच
स्वरा स्वरांत भास तूच ।।
*अरविंद*