माजी आमदार प्रमोद जठार यांची ग्वाही
वैभववाडी
सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील विकासाची प्रलंबित कामे व रखडलेले प्रकल्प केंद्रीय उद्योगमंत्री नारायणराव राणे यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोत. दहा वर्षाचे अथक प्रयत्न व पाठपुराव्यानंतर कोकिसरे रेल्वे फाटक भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात होत आहे. भुयारी मार्गाचे काम हे स्थानिक जमीन मालकांना विश्वासात घेऊन होणार आहे. जमीन मालकांवर अन्याय होणार नाही. असा विश्वास माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.
कोकिसरे रेल्वे फाटक येथे मंजूर असलेल्या भुयारी मार्गाच्या संयुक्त जमीन मोजणी कामाचा शुभारंभ कोकिसरे येथे माजी आ. प्रमोद जठार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी वैभववाडी भाजपाध्यक्ष नासीर काझी, सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे, माजी सभापती भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण, सज्जनकाका रावराणे, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, राजेंद्र राणे, बंड्या मांजरेकर, कोकिसरे सरपंच दत्ताराम सावंत, रोहन रावराणे, संजय सावंत, प्रदीप नारकर, किशोर दळवी, दाजी पाटणकर, सुनील रावराणे, प्रकाश पांचाळ, प्रदीप जैतापकर, राजू पवार, अवधूत नारकर व ग्रामस्थ, जमीन मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जठार म्हणाले, या रेल्वेमार्गावरून दर दिवशी साठ गाड्या ये – जा करतात. त्यामुळे तब्बल नऊ ते दहा तास फाटक बंद करावा लागतो. कोल्हापूरला जाण्यासाठी किंवा आजारी, गरोदर मातांना या फाटकाचा नेहमी त्रास सहन करावा लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे या कामाचा आम्ही सतत पाठपुरावा केला. केंद्राने या कामाला तब्बल ६५ कोटी दिले आहेत. हळवल उड्डाण पुलाचा वाईट अनुभव लोकप्रतिनिधींना होता. त्यामुळे येथे सर्व नियोजनबद्ध परवानग्या मिळविण्यात आम्ही यशस्वी झालो असे जठार यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, मोजणी झाल्यानंतर टेंडर प्रोसिजर होईल, व फेब्रुवारी-मार्च महिन्यात भुयारी मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असे त्यांनी सांगितले. यावेळी काही जमीन मालकांनी आपल्याला मोजणीच्या नोटीस आल्या नसल्याचे सांगितले. नोटीस आल्या नसल्या तरी त्या सर्वांना येणार, कोणावरही अन्याय होणार नाही. याबाबत आणखी समस्या असल्यास नासीर काझी, भालचंद्र साठे, सुधीर नकाशे यांच्याशी संपर्क साधावा असे जठार यांनी सांगितले. यावेळी नारकर वाडीतील यशवंत नारकर, दीपक नारकर, योगेश नारकर, अतुल नारकर, आनंद नारकर, संजय नारकर, गणपत तानवडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.