गावागावात दारू अड्डयांवर धाड टाकून करतात कमाई
राज्य उत्पादन खात्याचे जिल्ह्यातील काम सर्वांनाच माहिती आहे. गोवा बनावटीची अवैध दारू जिल्ह्यातून कित्येकदा महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात पोचविली जाते परंतु जिल्हा राज्य उत्पादन कडून किरकोळ कारवाई वगळता अवैध दारू वाहतुकीवर केवळ मुंबई इत्यादी ठिकाणाहून आलेल्या पथकांकडून कारवाई होताना दिसून येते.
जिल्ह्यात नव्याने दाखल झालेले कोल्हापूर येथील राज्य उत्पादन शुल्क खात्याचे पथक गावागावात दारू अड्डयांवर प्रत्यक्ष धाड टाकत कारवाई (?) करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या एका कर्मचाऱ्याची मर्जी सांभाळत कोल्हापूर येथील पथक गावागावात सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यांकडे पोचते. घराच्या आजूबाजूला पथकातील कर्मचारी फिरतात. त्यानंतर दारू अड्डा चालविणाऱ्या व्यक्तीकडे दबावाचा वापर करून ५०००/- रुपयांची मागणी करतात. अशाप्रकारे जिल्ह्यातील दारू अड्डयांवर फिरून हे पथक पैसे गोळा करतात आणि जीवाचा गोवा करून माघारी जातात.
सकाळी कोल्हापूरला परतीच्या प्रवासाला निघताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली, कुडाळ, ओरोस आदी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयांना भेटी देत फोंडाघाट मार्गे संध्याकाळी कोल्हापूरला पोचतात. आज संध्याकाळी कोल्हापूर येथील पथकाने गोवा बॉर्डर नजीकच्या एका गावात सुरू असणाऱ्या दारू अड्डयांवर हे पथक पोचले. आपली बोलेरो गाडी समोर लावत पाच हजारांची मागणी केली. मालकाने पैसे देण्यास असमर्थता दर्शविताच “तुम्ही दारू विकता अशी माहिती मिळाली आहे”, असे सांगत पैसे न दिल्यास केस घालण्याची धमकी वजा भीती दाखवली. धाड टाकूनही मुद्देमाल न मिळाल्याने त्याच्या हाताचे ठसे घेतले. ती व्यक्ती दारूचा धंदा करत असल्याने त्याने कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केले.
कोल्हापूर येथून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक जिल्ह्यात दाखल झाल्यावर अवैध व्यवसायावर टांगती तलवार येईल, अवैध व्यवसायाला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच कोल्हापूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकच आपल्या जीवाचा गोवा करताना दिसत असल्याने कुंपणच शेत खात असताना अवैध व्यवसायाला आळा बसण्या ऐवजी मागणी प्रमाणे पैसे देऊन अवैध व्यवसायच जोमाने वाढणार अशी भीती उत्पन्न होत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कोल्हापूर येथील पथकांकडून होत असलेल्या करवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.