मालकाच्या मृतदेहा समोर बैल तब्बल दोन तास उभा; मालकाचा मुलगाही जखमी
कुडाळ
रांगणा तुळसुली येथील वहळात बैलाला धुताना ‘त्या’ बैलाने मालकावर हल्ला केला. या हल्ल्यात ५५ वर्षीय बैल मालक विलास शेट्ये (रा. रांगणा तुळसुली, कदमवाडी) हे जागीच ठार झाले. त्यांचा मृतदेह पाण्यात असताना तो बैल मृतदेहा समोर तब्बल दोन तास उभा होता त्यामुळे मृतदेह बाहेर काढणे सर्वांनाच कठीण झाले होते अखेर बैलाला त्याठिकाणाहून हटवून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला या हल्ल्यात बैल मालकाचा मुलगा हि जखमी झाला आहे. याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली आहे.
पोलीस ठाण्यात खबर देणारे मेघनाथ शेट्ये यांनी सांगितले की, बुधवारी रोजी सकाळी 10:45 वाजण्याच्या सुमारास ते व त्यांचे वडील विलास शेट्ये यांच्या समवेत बैल चरवुन झाल्यानंतर रांगणा तुळसुली पडत्याचा व्हाळ बैलाला धुण्यासाठी घेवुन गेले. यावेळी बैलाला धुत असताना विलास शेट्ये यांना बैलाने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे विलास शेट्ये खाली असलेल्या काळेथर दगडावर आदळले व जखमी झाले. त्यानंतर बैलाने पुन्हा पुन्हा विलास शेट्ये यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे विलास शेट्ये यांच्या छातीत, डाव्या हातास, डोळ्याखाली मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापत झाली व त्यातच ते जागीच मयत झाले अशी खबर दिली.
यावेळी विलास शेट्ये यांचा मुलगा मेघनाथ शेट्ये हा ही जखमी झाला त्याच्यावर कुडाळ ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले.
दोन तास फिरकायला दिले नाही.
घटनास्थळी विलास शेट्ये यांचा मृतदेह पडुन होता. बैल ही तिथेच होता. तो जवळपास कोणालाच फिरकायला देत नव्हता. सुमारे दोन तासानंतर या बैल बाजुला गेला. अशी माहिती घटनास्थळी असलेल्या ग्रामस्थांनी दिली. या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून याचा तपास पोलिस करीत आहे.