You are currently viewing दिवाळी बाजाराचे २८ ऑक्टोबर रोजी होणार माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

दिवाळी बाजाराचे २८ ऑक्टोबर रोजी होणार माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

कणकवली नगरपंचायत पुरस्कृत युथ वेल्फेअर असोसिएशनचे आयोजन

कणकवली

नगरपंचायत कणकवली पुरस्कृत व युथ वेल्फेअर असोसिएशन संस्थेच्या माध्यमातून पार पाडणाऱ्या कणकवली येथील दिवाळी बाजाराचे उद्घाटन गुरुवार दि. २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता माजी खासदार आणि भाजपाचे प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली आहे. कणकवली शहरातील पेट्रोल पंपासमोर कणकवली नगरपंचायत पुरस्कृत आणि युथ वेलफेअर असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून दिवाळी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे.

या बाजारामध्ये कणकवली शहरातील बचत गटांच्या महिलांनी उत्पादित केलेला दिवाळीचा फराळ आणि तालुक्यातील कुंभार बांधवांनी मातीपासून बनवलेल्या विविध वस्तू ठेवण्यात येणार आहेत. वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री हा या दिवाळी बाजाराचा उद्देश आहे. कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी या बाजारासाठी विनामूल्य जागा आणि स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत. तालुक्यातील आणि कणकवली शहरातील महिला भगिनींची आर्थिक उन्नती व्हावी, कुंभार बांधवांसारखा दुर्लक्षित समाज घटक मुख्य प्रवाहात यावा, त्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी या दिवाळी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. कणकवली शहरामधल्या पेट्रोल पंपासमोरील मुंबई-गोवा महामार्गावरच्या पुलाखाली हा बाजार भरणार आहे.

या बाजारामध्ये बचत गटाच्या महिला भगिनी आपला दिवाळी फराळासारखा उत्पादित माल ठेवणार आहेत. तसेच तालुक्यातील कुंभार बांधव मातीपासून बनवलेल्या विविध वस्तू या बाजारात प्रदर्शनासाठी आणि विक्रीसाठी ठेवणार आहेत. कुंभार बांधव आपल्या वस्तू कशा बनवतात याचे प्रात्यक्षिक देखील या ठिकाणी ठेवले आहे. दरम्यान माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते या दिवाळी बाजाराचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली आहे. दरम्यान या दिवाळी बाजार स्थळाची कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेविका मेघा गांगण, अण्णा कोदे, संदीप मेस्त्री, युथ वेल्फेअर असोसिएशनचे विवेक ताम्हणकर, मनिष सागवेकर, रउफ काझी, अनिकेत घाडीगांवकर, विराज तावडे, पंडित परब आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा