कणकवली
नगरपंचायत च्या मार्फत काल मंगळवार आठवडा बाजाराच्या दिवशी 75 मायक्रॉंन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करत धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत बाजारपेठेतील विक्रेत्यांकडून 75 मायक्रॉंन पेक्षा कमी जाडीच्या सुमारे 35 किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. शासनाच्या आदेशानुसार 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आहे. ही बंदी झुगारून अनेक विक्रेते प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असल्याची बाब नगरपंचायत च्या निदर्शनास आल्यानंतर कणकवली मुख्याधिकारी अवधुत तावडे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
यात काही विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. तसेच बाजारपेठ रस्त्यावर काही दुकानदारांकडून रस्त्यापर्यंत दुकाने पुढे लावली गेल्याने अनेकदा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. त्याबाबतही संबंधित विक्रेते व व्यापार्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच काही विक्रेत्यांकडून रस्त्यावरच कचरा टाकल्याचा प्रकार समोर आल्याने या विक्रेत्यांना घंटागाडी मध्ये कचरा टाकण्यात बाबत सूचना देण्यात आल्या.
या कारवाईत नगरपंचायत चे स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, नगर पंचायत कर्मचारी प्रवीण गायकवाड, प्रितेश खैरे,विनोद जाधव, प्रकाश राठोड, समीर मोरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. यापुढे देखील ही कारवाई अशीच सातत्याने सुरू राहणार असून 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरल्यास मोठ्या दंडात्मक कारवाईला देखील सामोरे जावे लागेल असा इशारा नगरपंचायत कडून देण्यात आला आहे.