नितेश राणेंच्या सहकार्याने होणार प्रत्येक तालुक्यात उद्योग व्यवसाय प्रशिक्षणे…
वैभववाडी
केंद्र शासनाच्या विविध योजनांचा पुरेपूर लाभ महिला बचत गट व बेरोजगार तरुणांनी घेतला पाहिजे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे साहेब यांच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खात्यामार्फत अनेक वेगवेगळ्या योजनांचा प्रसार व काटेकोर अंमलबजावणीसाठी सौजन्य फाउंडेशन ने पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय उभारुन गावातील तरुणांचे होणारे स्थलांतर थांबवणे, हाच मुख्य उद्देश फाउंडेशनचा राहणार आहे. असे प्रतिपादन सौजन्य फाउंडेशनच्या संचालिका सीमा भट यांनी केले.
वैभववाडी पंचायत समिती सभागृहात सौजन्य फाउंडेशन च्या वतीने महिला बचत गट सक्षमीकरण शिबिर पार पडले. यावेळी सभापती सौ. अक्षता डाफळे, फाउंडेशनच्या जिल्हा प्रमुख सौ. प्राची तावडे,श्रीमती शुभांगी पवार, सौ. स्नेहलता चोरगे, सौ. सीमा नानिवडेकर व तालुक्यातील सर्व बचत गटातील महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.
सीमा भट म्हणाल्या, गावातील तरुण व इतर लोकांना गावातच रोजगार उपलब्ध होईल या दृष्टीने फाउंडेशनचे प्रयत्न राहणार आहेत. आमदार नितेश राणे यांच्या सहकार्याने लवकरच प्रत्येक तालुक्यात शिबिरे घेतली जाणार आहेत. फाउंडेशनची टीम ६ महिने जिल्ह्यात काम करणार आहे. योजनांची माहिती, प्रचार प्रसिद्धी व प्रशिक्षण या वेळी दिले जाणार आहे. महीन्याच्या प्रत्येक शनिवारी व रविवारी ३० मुलांची व महिलांची सेमिनार घेतली जाणार आहे. या सेमिनारमध्ये पूर्ण प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्ह्यात गो शाळेचे नियोजन, फेकल्या जाणाऱ्या वस्तू किंवा टाकाऊ वस्तू उत्पादन प्रक्रियेत आणणे, शेतीपूरक व्यवसाय उभारणे, खादी ग्रामोद्योग योजना, स्फूर्ती क्लस्टर योजना याबाबत पूर्ण माहिती फाउंडेशन मार्फत दिली जाणार असल्याचे सांगितले. यशवंत पंडित यांनी स्फूर्ती च्या माध्यमातून क्लस्टर डेव्हलपमेंट कसे केले जाईल, त्यासाठी कोणते उद्योग निवडावेत, प्रशिक्षण कसे घ्यायचे, याबाबत मार्गदर्शन केले. भविष्यात कोणते व्यवसाय स्पर्धेत टिकतील व त्यादृष्टीने बचत गटांनी पावले उचलली पाहिजे याबाबत त्यांनी माहिती दिली. यावेळी बचत गटाच्या महिलांनी काही शंका व प्रश्न विचारले. त्याची उत्तरे सीमा भट व यशवंत पंडित यांनी दिली.