बांदिवडे गणपती मंदिरच्या मागे बसली जुगाराची मैफिल…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक बदलून नवीन अधिकारी आले परंतु खाकीच्या व्यवस्थेत मात्र कोणताही बदल झाला नाही. जिथे मुळापासूनच पोखरलेलं असतं तिथे शेंड्यावर येऊन कोणीही बसला तरी फरक पडत नाही. अशीच काहीशी गत झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गैरधंद्यांची. दारू, मटका, जुगार, ड्रग्स असे एक ना अनेक अवैद्य धंदे चालतात तिथूनच पगारापेक्षा जास्त पैसा मिळतो त्यामुळे अधिकारी आले नी गेले तरी अवैद्य धंदे मात्र सुरूच राहतात.
देवगड तालुक्यातील विजयदुर्ग रोडवरील फणसगाव येथे जवळपास १५ दिवस चाललेली जुगाराची बैठक तेव्हाच आटोपती आली होती जेव्हा जुगाराची तकशीम घेणाऱ्या मालकाला स्वतःला कोरोना झाला आणि त्यामुळे इतर जवळपास ७० लोकांना त्याची बाधा झाली होती. त्यातील ३०/३५ जण अजूनही कोरोनाच्या त्रासामुळे स्वतःच्या घरात आहेत. फणसगाव येथील बैठक आटोपती घेतल्यावर आता पुन्हा नवीन जागा शोधून जुगाराची तकशीम बसली आहे ती *आचरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आडीवली, बांदिवडे येथील गणपती मंदिरच्या मागे*.
जुगाराची बैठक पोलिसांची भागवाभागवी केल्याशिवाय बसतच नाही. मग ती वरिष्ठ पातळीवर असो वा ज्या हद्दीत बसते त्या हद्दीतील पोलीस स्टेशनची असो. परंतु कोरोनाच्या काळात जिल्ह्यात जिकडे तिकडे बाजारपेठा १५/१५ दिवस बंद ठेऊन कोरोनावर विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करतात तर दुसरीकडे जुगारासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोक एकत्र येत रात्रंदिवस मजा मारतात. त्यामुळे अशा बैठकांमधून कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होतो. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कोरोनाच्या लढ्यात प्रबळपणे उतरली होती परंतु जुगाराच्या बैठकीतील हफ्ता मिळणार म्हणून तीच पोलीस यंत्रणा अशाप्रकारे जुगाराची बैठक का बसू देते? असा प्रश्न उभा राहिला आहे.
बांदिवडे गणपती मंदिरच्या मागे बसलेल्या जुगारात खुद्द एक प्रसिद्ध वाळू व्यावसायिक, फोंडा येथील पारावर विठ्ठल विठ्ठल जप करत असणारी एक अट्टल जुगारी, कणकवलीतील जुगारी टिंगल कोणतरी, सावंतवाडीच्या शेजारील गावातील माजी ग्राम.पंचायत सदस्य, बांदा येथील आबलो, खानाचो जब्बर माणूस, सावंतवाडीच्या सावंतांचा विशाल हृदय असलेला जुगारी, कुडाळातील आनंदी आनंद गडे म्हणत फळांचा व्यापार करणारा एक, मसुरे येथील शा** कपूर, मालवण, वेंगुर्ला, फोंडा येथील अनेकजण जे नेहमी जुगाराची तकशीम घेतात ते सर्वच जण बांदिवडे येथील जुगाराच्या अड्ड्यावर हजर आहेत.
जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांना आळा बसावा म्हणून उठाव होत असतानाच, आणि पोलिसांकडून छोटी मोठी कारवाई सुरू झालेली असतानाच जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून दैदीप्यमान कामगिरी करणारे दिक्षितकुमार गेडाम यांची बदली झाली. त्यामुळे अवैद्य धंद्यांवर सुरू झालेली कारवाई तात्काळ बंद झाली.
कणकवली, कुडाळ सहीत जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा कहर पाहता जुगाराच्या अड्ड्यांमध्ये त्याचा फैलाव अधिक प्रमाणात होऊन जिल्ह्यातील कोरोनाचे संकट आणखी प्रबळ होणार. अशा गैर धंद्यांमुळे होणाऱ्या कोरोनाच्या प्रसाराची जबाबदारी आचरा पोलीस स्टेशन घेणार की एलसीबी घेणार की जिल्ह्या पोलीस अधीक्षक घेणार? जिल्ह्यात नव्याने आलेले पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी बसणारे हे मोठमोठे लाखो रुपयांची एका दिवसात उलाढाल होणारे जुगाराचे गैरधंदे तात्काळ बंद केले जातील आणि जुगार, दारू, मटका, ड्रग्स अशा अवैद्य धंद्यांना आळा घातला जाईल अशी समस्त जिल्हावासीयांची भावना आहे.
जिल्ह्याचे नवे पोलीस प्रमुख नक्कीच आपल्या कर्तव्यात खरे उतरतील अशी अपेक्षा जिल्हावासीयांना आहे.