You are currently viewing आंबडोस येथील प्रकाशिका नाईक हिची मुंबई महिला संघाचा उपकर्णधार पदी निवड…

आंबडोस येथील प्रकाशिका नाईक हिची मुंबई महिला संघाचा उपकर्णधार पदी निवड…

मालवण:

मालवण तालुक्यातील आंबडोस गावची कन्या प्रकाशिका प्रकाश नाईक हिची मुंबई महिला क्रिकेटच्या सिनिअर संघाच्या उपकर्णधार पदी निवड झाली आहे. गेली बारा वर्षे ती देशात एक अष्टपैलू महिला क्रिकेटरमधून प्रचंड मेहनत घेत पुढे आली आहे. २३ वर्षीय प्रकाशिका हिच्या या निवडीने आंबडोस गावात आनंद व्यक्त केला जात आहे.
संत गाडगेबाबा महाराज स्वच्छता अभियान स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या आंबडोस गावाने नेहमीच केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येक योजनेत ठसा उमटविला आहे. तसेच या गावात अनेक नररत्न आहेत. त्यामुळे गावाचे नाव रोषण झाले आहे. त्यात आता प्रकाशिका हिच्या यशाने अधिक भर पडली आहे. आंबडोस गावातील पावणवाडी येथील प्रकाश नाईक यांची मुलगी आहे. सध्या ते मुंबई येथे स्थायिक असून लहानपणा पासून प्रकाशिका हिला क्रिकेटची आवड होती. वडील प्रकाश यांनीही यासाठी प्रचंड मेहनत घेत तिला क्रिकेटर बनविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
प्रकाशिका ही गेली बारा वर्षे मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून खेळत आहे. १९ वर्षांखालील महिलांच्या क्रिकेट संघात तिचा समावेश होता. यावेळी तिने अष्टपैलू खेळाडू म्हणून छाप पाडली होती. त्यामुळे तिची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सिनिअर संघात निवड झाली आहे. येथेही तिची अष्टपैलू कामगिरी सुरू आहे. याच कामगिरीच्या जोरावर तिची संघाच्या उपकर्णधार पदी निवड झाली आहे. उपकर्णधार निवडीनंतर प्रथमच पुणे येथे सामने होणार आहेत. दरम्यान, महिला क्रिकेटमध्ये उज्वल यश संपादन करताना तिने आपल्या आंबडोस गावाशी असलेली नाळ तोडू दिलेली नाही. गावच्या महत्वाच्या कार्यक्रमांना क्रिकेट स्पर्धा नसताना ती हजर असते. स्वतः क्रिकेट खेळत असताना नवनवीन महिला क्रिकेटर्सना ती धडे देत असून मार्गदर्शन करीत आहे. दरम्यान, या निवडीने आंबडोस गावासह पंचक्रोशीत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच यामुळे आंबडोस वासिय याबाबत सार्थ अभिमान व्यक्त करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा