*- नगरसेवक शिशिर परुळेकर यांचा सणसणीत इशारा*
ज्या शिवसेनेच्या राज्यात ऐशारामी आणि विलासी मंत्र्यांची चैनबाजी चालली आहे आणि जनता त्रस्त होत आत्महत्या करत आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांना बेरोजगार युवावर्गाच्या पोटातली आग काय कळणार? खासदार विनायक राऊत यांना खुश करण्यासाठी जि.प. गटनेते नागेंद्र परबानी जठारांवर फणा काढण्यापेक्षा युवावर्गाची परिस्थिती पहावी. नागेंद्र परब यांनी चार लाख कोटींचा नाणार रिफायनरी प्रकल्प विनाशकारी आहे की नाही यावर तज्ज्ञांच्या उपस्थितीत परिसंवाद भरवावा. ठेकेदाराकडून मलई मिळत नाही म्हणून प्रकल्पाला विरोध करायचे शिवसेनेचे दळभद्री राजकारण परबानी आता पुरे करावे, असा परखड इशारा कणकवली नगरपंचायतीचे भाजपा नगरसेवक श्री शिशिर परुळेकर यांनी दिला आहे.
प्रमोद जठार यांच्यावर रिफायनरी विषयावरून नागेंद्र परब यांनी टीका करताना मधु दंडवतेंच्या भाषणाचा दाखला देत जहरी टीका केली होती. त्याला त्याच भाषेत प्रतिउत्तर देत नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी परब यांच्यावर सणसणीत टीका केली आहे.
परूळेकर म्हणाले आहेत की रिफायनरी प्रकल्प आपण स्वतः आणत असल्याची घोषणा रत्नागिरीत सर्वांत प्रथम पत्रकार परिषदेत कोणी केली, नागेंद्र परब यांनी शोधावे. खात्री झाल्यानंतर त्याच शब्दात तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणवून घ्यायचा नैतिक अधिकार उरलेला नाही हे विनायक राऊत यांना ऐकवावे. आपल्या भावनेशी परब तेव्हाही प्रामाणिक राहतील अशी अपेक्षा करायची का?
ज्या मधु दंडवतेंचा दाखला देता, त्यांनी कोकणच्या विकासासाठी कोकण रेल्वे आणली. खासदार विनायक राऊत यांचे कोकण विकासातले योगदान जाहीर करा, असे आव्हानही त्यांनी दिले.
आता ज्यांच्या प्रेमाचा पान्हा फुटलाय, त्याच मधु दंडवतेना पाडण्यासाठी शिवसेनेने वामनराव महाडीकांचं बळी दिला होता, हे विसरलात का असे विचारत त्यानी म्हंटले आहे की खासदार विनायक राऊत हे दोन्हीकडच्या मांडवातले वडे खाणारे आहेत. सिंधुदुर्ग विमानतळाच्या विरोधात तेव्हा ते नाणार रिफायनरीसारखेच हिरीरीने विरोध करत होते, आणि प्रकल्प भाजपाने पूर्ण केल्यावर लगीनघरातल्या सारखे काल तिथे कसे निर्लज्जपणे बोवळत होते, ते ही कोकणच्या जनतेने पाहिले. लोकप्रतिनिधी हा जनतेच्या भावना मांडण्यासाठी असतो हे तुमचे म्हणणे शंभर टक्के खरे आहे. पण केवळ ठेकेदार म्हणजे जनता नव्हे हे सत्य एकदा खासदार राऊतना सुनावण्याची हिंमत परब यांनी करावी.
मुख्यमंत्री दलालांचे ऐकतात की कोणाचे हे आम्हाला माहीत नाही. पण कोकणातल्या तुमच्या लोकप्रतिनिधींचे काडीमात्र ऐकत नाहीत हे जगजाहीर झाले आहे. मात्र त्यामागचे कारण दलाली हे तुमच्याकडूनच स्पष्ट झाले हे ही छान झाले, असा टोला शिशिर परूळेकर यांनी लगावला आहे.
महामार्ग प्रकरणी गडकरी दोषी आहेत असे शिवसेनेचे म्हणणे असेल तर गडकरींविरोधात जनआंदोलन उभे करण्याची हिंमत शिवसेनेने दाखवावी. कोकणात शिवसेनेच्या करंटेपणाने महामार्गाची वाट लागली हे गडकरी जाहीरपणे बोलले आहेत, हे नागेंद्र परबांना माहीत नाही का? गडकरींसमोर शेपटी घालून वावरणाऱ्या कागदी वाघांनी पाठीमागून पोकळ डरकाळ्या फोडू नयेत. जठार यांना दलाल म्हणण्यापूर्वी दलाली म्हणजे काय आणि ती कोणत्या क्षेत्रात केली जात आहे हे परबांनी आपल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडे पाहून अभ्यासावे. जनतेत काय चर्चा चालते ती ऐकावी. मग चपलांचा मार कोण खाणार आहे हे परबांना कळेल. चपलांची भाषा करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांची त्यांच्याच पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याने राजापूरच्या जाहीर आव्हान देत खेटरपूजा कशी घातली होती त्याचा अलीकडचा ताजा इतिहास आधी नागेंद्र परबांनी तपासावा.
उद्धव ठाकरे जर जनतेला दिलेला शब्द पाळणारे आहेत तर काँग्रेस राष्ट्रवादीला जाहीरपणे चोर दरोडेखोर संबोधत त्यांच्या पापाचे पुस्तक काढण्याचा शब्द पाळायची आठवण नागेंद्र परबांनी ठाकरे यांना करून द्यावी. त्या पुस्तकाचे प्रकाशन सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार विनायक यांच्या शुभहस्ते कधी करणार हे ही परबांनी जाहीर करावे.
नागेंद्र परब म्हणजे उद्धव ठाकरेंच्या रबरस्टॅम्प सरकारचे सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेतले शाई सुकलेले स्टॅम्पपॅड आहेत. खासदार विनायक राऊतांची भाटगिरी करत शाई ओली होण्याच्या अपेक्षेने चाललेली पायचाटूगिरी सामान्य शिवसैनिकांच्याही लक्षात आली आहे. पक्षात काडीचीही नसलेली किंमत मिळवण्यासाठी त्यांची प्रमोद जठारांवर टीका चाललेली आहे.
रिफायनरी नको तर लाखो बेरोजगारांना रोजगाराचा दुसरा उद्योग आणायची हिंमत उद्धव ठाकरेंच्या रबरस्टॅम्प सरकारने आणून दाखवावा. त्यानंतरच काय तो नागेंद्र परबानी आपला फणा काढावा. तोवर उगाच जठारांच्या मत्सराचा फुत्कार काढत आपली लाज काढून घेऊ नये. जठारांवर दलालीचा आरोप करणाऱ्याना कणकवली अंधारात पाठच्या दाराने येऊन, जठारांचे पाय पकडून कशी माफी मागावी लागली याची माहिती परबानी आपल्या नेत्यांकडून खाजगीत घ्यावी. अतिउत्साहीपणा करून उरलेली इभ्रत पणाला लावण्याचा जुगार खेळू नये, तो अंगलट येईल असा इशारा श्री शिशिर परूळेकर यांनी दिला आहे.