आगीत सुमारे अडीज लाखांचे नुकसान;सुमारे दीड दोन तासाने आग नियंत्रणात आणण्यात यश
मालवण
मालवण सोमवारपेठ भागातील विलास एजन्सीज या दुकानाला आज भल्या पहाटे अचानक आग लागल्याने कीटक नाशके, खते व इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे अडीज लाख रुपयांचे नुकसान झाले. दिवाळी जवळ आल्याने बाजारपेठेत आपल्या दुकानाची झाडलोट करीत असलेल्या युवा दुकानदारांना ही आग नजरेस पडल्यानंतर त्यांनी धावाधाव करून बाजारपेठतील नागरिकांना आणि नगरपालिकेला माहिती दिल्याने सुमारे दीड दोन तासाने आग नियंत्रणात आणण्यात यश आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
मालवण सोमवारपेठ येथील हनुमान मंदिर समोर विलास हरमलकर यांचे विलास एजन्सीजचे खत, कीटकनाशके विक्रीचे दुकान आहे काल रात्री श्री हरमलकर हे नेहमी प्रमाणे दुकान बंद करुन घरी गेले. आज पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास विलास एजन्सीज या दुकानाला आग लागली दुकानातून येणाऱ्या मोठ मोठ्या ज्वालानी आकाश व्यापून जात असल्याचे चित्र विलास एजन्सीज पासून जवळच असलेल्या सोमवारपेठ येथील गुरुमाऊली या कपड्याच्या दुकानात साफसफाई करणाऱ्या राजेश मुंबरकर तसेच शुभम अंधारी आणि त्याच्या इतर मित्र मंडळींना दिसताच त्यांनी धावाधाव करीत नगरपालिकेला तसेच नागरिकांना आणि दुकानाचे मालक विलास हरमलकर यांना आगीची माहिती दिली.
यावेळी नागरिकांनी विहिरीला पंप लावून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला यावेळी नगरपालिकेचे मुकादम श्री वळंजू यांनी नगरपालिकेतून फायर बॉल आणून आगीच्या ठिकाणी मारा सुरू केला यावेळी राजेश मुंबरकर ,शुभम अंधारी,अमेय देसाई,स्वप्नील अंधारी व इतर तरुणांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले यावेळी आग आटोक्यात आणण्यासाठी अमेय देसाई, फारुख ताजर, दुकान मालक विलास हरमलकर, विनायक सापळे, रणजित पारकर, रमेश पारकर , रंजन मुंबरकर, दिनेश मुंबरकर,स्वप्नील अंधारी , समीर कदम, भूषण मुंबरकर, शेखर अंधारी, दुर्गेश परब, आदित्य देसाई, आकाश खोत, हरेश मुंबरकर, सरदार ताजर, मुकादम आनंद वळंजू, कोकरे यांच्यासह व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर,माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, मंदार केणी, नितीन तायशेटे व इतर नागरिकांनी यांनी अथक परिश्रम घेतले.
अन फायर बॉल उपयोगी पडले
हरमलकर यांच्या दुकानाला आग लागल्याचे समजताच नगरपालिकेचे मुकादम श्री वळंजू आणि त्यांचा मुलगा विरेश वळंजू यानी धावाधाव करीत नगरपालिकेतून फायर बॉल आणून ते भडकलेल्या आगीवर फेकले आग विझविण्यासाठी आठ फायर बॉलचा वापर केला गेला त्यामुळे बऱ्याच अंशी आग आटोक्यात आल्याची माहिती घटनास्थळावरून देण्यात आली आहे