You are currently viewing शेतकऱ्यांची लूट, हे तर बेईमान सरकार – आमदार नितेश राणेंचा घणाघात

शेतकऱ्यांची लूट, हे तर बेईमान सरकार – आमदार नितेश राणेंचा घणाघात

कणकवली

ठाकरे सरकारचे नाव बदलून बेईमान सरकार असे नाव ठेवण्याची वेळ आली आहे.स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांशी बेईमानी, राज्यासह कोकणातील शेतकऱ्यांची फसवणूक, प्रामाणिक मच्छीमारांशी बेईमानी आणि बेकायदा मासेमारी करणाऱ्यांकडून हप्ते घेऊन दिले जाणारे अभय, मराठी माणसाला पायाखाली चिरडून ड्रग्ज माफियांची केली जाणारी पाठराखण हे ठाकरे सरकार आणि त्यांचे मंत्री करत आहेत.शेतकरी,मच्छीमार, कष्टकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून एक दमडी सुद्धा न देणाऱ्या या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली आहे.अशा या सरकारचे नाव बदलून बेईमान सरकार असे नाव ठेवले पाहिले अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली.
कणकवलीत प्रहार भवन येथे भाजपा प्रदेशच्या वतीने आयोजित रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पत्रकार परिषदेत भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतला.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, भाजपा कृषी मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत,कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,शहर अध्यक्ष अण्णा कोदे आदी उपस्थित होते.

राज्यातील शेतकरी ठाकरे सरकारच्या काळात अंधारात आहे. मुख्यमंत्र्यांच्या पायगुणामुळे अघोरी संकटे राज्यावर आलीत. कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या सर्वाधिक महाराष्ट्रात झाली.शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठाकरे सरकारने काय केले ? विधानसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांच्या बांधावर जात २५ हजार ची नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली होती .मग आता त्या घोषणेचे काय झाले ? स्व. बाळासाहेबांचा शब्द हा बंदुकीच्या गोळीसारखा होता.स्व. बाळासाहेबांचा मुलगा येऊन आश्वासन देतो म्हणून शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला .पण प्रत्यक्षात काय झाले ? कोकणातील शेतकरी पुन्हा उभा राहणार कसा ? ५० हजार एनपीए देण्याची नागपूर विधानसभेत घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरेंना “क्या हुआ तेरा वादा ?” असा प्रश्न विचारण्याची वेळ आली असल्याचा घणाघात आमदार नितेश राणे यांनी केला.

शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणण्याचे पाप ठाकरे सरकारचे आहे. मच्छीमारांकडून हफ्तेखोरीत पालकमंत्र्यांचे भाऊ व्यस्त आहेत. पिकविमा कंपन्यांची मुजोरी वाढली आहे. शेतकऱ्यांची फक्त आर्थिक लूट पिकविमा कंपन्या करताहेत. मुंबईतील पीकविमा कंपनीचे ऑफिस शिवसेनेने फोडले होते ते मातोश्रीवर आर्थिक सेटलमेंट साठी केली होती काय ? ड्रग्ज घेणाऱ्यांना संरक्षण देणारे ठाकरे सरकार शेतकऱ्यांबद्दल काय करणार ? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी केला. फक्त दिवसभर वसुली एके वसुली हे एकच काम राज्य सरकारचे मंत्री करत आहेत असाही आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा