दोडामार्ग:
दरवर्षीच्या पावसाळ्यात मणेरी,कुडासे आदी गावांमध्ये उदभवणाऱ्या पूर परिस्थितीवरून तसेच अलीकडेच घडलेल्या कालवा फुटीवरून गुरुवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व तिलारी पाटबंधारे प्रकल्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मणेरी,कुडासे तसेच अन्य बऱ्याच गावातील ग्रामस्थ,लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतले.दोडामार्गात तहसीलदार कार्यालयात आयोजित एका बैठकीत या दोन्ही विभागांच्या कारभाराचा पंचनामा करण्यात आला.यावेळी दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली.
मणेरी येथील नदी पात्रातून मोठ्या पाईप लाईनद्वारे वेंगुर्ले-मालवण येथे नेण्यात येणार आहे.त्यासाठी मणेरी मधून दोडामार्ग-बांदा रस्त्यालगतच्या साईडपट्टी जवळून मोठी पाईपलाईन टाकण्यात आली आहे.या पाईपलाइनचे काम तसेच अन्य कामांतर्गत कार्यवाही करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने गलथान कारभार केल्यामुळेच मणेरी परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होते.त्यावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार अरुण खानोलकर यांनी मणेरी ग्रामस्थ व जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकीला तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे अधिकारीही उपस्थित होते.तर जीवन प्राधिकरणाच्या वतीने उपअभियंता मंगेश चिटणीस,सहाय्यक उपअभियंता अमोल कुंभार,पाटबंधारे प्रकल्प प्रशासनाच्या वतीने उपकार्यकारी अभियंता सुनील अंबि तसेच निवासी नायब तहसीलदार सत्यवान गवस,महसूल नायब तहसीलदार एन.एन.देसाई उपस्थित होते. .
या अधिकाऱ्यांवर उपस्थित मणेरी,कुडासे येथील ग्रामस्थांच्या वतीने विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधी व पदधिकार्यांनी प्रश्नाचा भडिमार केला.बडमेवाडी तसेच परिसरात दरवर्षी पावसाळ्यात जी पूरपरिस्थिती निर्माण होते तिला तुम्ही जबाबदार आहात.
स्थानिकांनी वारंवार मागणी करूनही त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यास चालढकल का केली जाते?पावसाळ्याच्या तोंडावर एप्रिल-मे महिन्यातच खोदाई का करता?या खोदाईमुळेच रस्ता खड्डेमय बनला आहे.असे प्रश्न विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.जोपर्यंत मणेरी याठिकाणी संरक्षक भिंत उभारली जात नाही तोपर्यंत तुम्हाला इतर कोणतेच काम करू देणार नाही असा सज्जड इशाराही देण्यात आला.
सक्षम अधिकारी बैठकीला उपस्थित नसल्याने अनेक प्रश्नाची उकल होत नाही.समस्यांचे निराकरण होत नाही.हे पाहता अधिकारी येण्यासाठी कालव्यांची कामेच बंद करण्याचा आक्रमक पवित्रा संतप्त ग्रामस्थांनी घेत बैठक संपताच मणेरी -आंबेली परिसरात सुरू असलेली कालव्यांची कामे बंद पाडली.
यावेळी जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिशा दळवी,पंचायत समिती सदस्य बाबुराव धुरी,बाळा नाईक,मणेरी सरपंच विशांत तळवडेकर,भाजप जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, भाजप तालुकाध्यक्ष प्रवीण गवस,भाजपयुमो उपाध्यक्ष चेतन चव्हाण,कोनाळ सरपंच पराशर सावंत,घोटगे सरपंच संदीप नाईक आदींसह ग्रामस्थ व सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.