You are currently viewing प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत जिल्हा राज्यात पहिला

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत जिल्हा राज्यात पहिला

जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक; बँकांच्या शाखांकडील प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत आज अखेर 94 टक्के वितरण करून जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आल्याबद्दल जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी उपस्थित सर्व बँक अधिकाऱ्यांचे कौतुक केले. शासनाच्या विविध योजनांची प्रकरणे अद्यापही ज्या बँकांच्या शाखांकडे प्रलंबित आहेत, ती त्वरित मार्गी लावावीत. त्यासाठी त्यांची बैठक घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

            जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक आज झाली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, रिजर्व बँक ऑफ इंडियाचे सुरज पोंक्षे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अजय थुटे, डीसीसी बँकेचे ए.वाय देसाई, जिल्हा उपनिबंधक एम.बी.सांगळे उपस्थित होते.

            अग्रणी जिल्हा व्यवस्थापक प्रदीपकुमार प्रमाणिक यांनी सुरुवातील विषय वाचन करून माहिती दिली. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत पीक कर्जात 88 टक्के, एकूण प्राधान्य क्षेत्रासाठी 42 टक्के वितरण झाले आहे. सीडी रेशोबाबतही त्यांनी माहिती दिली.

            जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ज्या बँकांच्या शाखांकडे विविध योजनांची प्रकरणे प्रलंबित आहेत अशी प्रकरणे मार्गी लावावीत. बँकांनी सीडी रेशोवर लक्ष द्यावे. त्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. बँकांनी पीक कर्जाबाबत उदिष्ट पूर्तता करुन जिल्ह्याला राज्यात अग्रेसर ठेवावे.

            यावेळी विविध महामंडळ आणि बँकांकडे प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध महामंडळाचे समन्वयक, बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा