जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी
कोविडमुळे एक पालक गमावलेल्या तसेच दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करावी. तसेच विधवा महिलांच्याबाबत गृहभेटी देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.
कोविड 19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. बैठकीला पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, महिला व बाल विकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नितीन काळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी, परिवीक्षा अधिकारी बी.जी.काटकर आदी उपस्थित होते.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी आढावा दिला. जिल्ह्यामध्ये एक पालक मयत बालके 233 असून दोन्ही पालक मयत बालके 14 आहेत. 314 विधवा असून 200 गृहभेटी पूर्ण झाल्या आहेत. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्व 14 बालकांची खाती उघडण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, विधवा महिलांच्या बाबतीत गृहभेटीसाठी अंगणवाडी सेविकांना सूचना देण्यात याव्यात. उमेदमार्फत विधवा महिलांना योजनाचा लाभ देण्याची कार्यवाही करावी. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळानेही या महिलांना योजनांचा लाभ द्यावा. ज्या बालकांचे पालक कोविड शिवाय इतक कारणांमुळे मृत झाले आहेत त्यांनाही बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याविषयी कार्यवाही करावी. तसेच त्यांना इतर योजनांचा लाभ देण्याविषयीही कार्यवाही करण्यात यावी.