सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनदृष्ट्या फार मोठे प्रकल्प आहेत. या पार्श्वभूमीवर येथील बंद असलेले उद्योगधंदे पुर्नजिवीत करण्याबरोबर व्यापार्यांना बळकटी देण्यासाठी पक्षातील वरिष्टांशी चर्चा करणार आहे, असे मत राष्ट्रवादी व्यापार व उद्योगसेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी आज येथे मांडले. दरम्यान या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते हे कट्टर आहेत. ते पक्षाध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणारे आहेत. त्यामुळे जे गेले त्यांच्या बद्दल न बोललेलेच बरे, असेही ते म्हणाले. श्री. फाटे यांनी आज सिंधुदुर्ग दौरा केला. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या निवासस्थांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, आगामी काळात होणार्या निवडणूका लक्षात घेता संघटना बळकट करण्याच्या उद्देशाने मी राज्याचा दौरा केला आहे. या ठिकाणी आल्यानंतर दर्दी कार्यकर्ते पहायला मिळाले. त्यामुळे भविष्यात निश्चितच पक्षाला मोठी ताकद मिळेल. कोण आले आणि कोण गेले यावर चर्चा करीत बसण्यापेक्षा जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांना घेवून संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
फाटे पुढे म्हणाले, सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे या ठिकाणी व्यापार उद्योगाला त्यांचा फायदा होवू शकतो. त्यादृष्टीने वरिष्ट नेेते आणि त्या खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेतले जाणार आहे, असे ते म्हणाले.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रांतिक सदस्य काका कुडाळकर, हिदायतुल्ला खान, देवेंद्र टेंबकर, शैलेश लाड, नवल साटेलकर, राजू धारपावर, इफ्तिकार राजगुरू, शफीक खान, दर्शना बाबर-देसाई , सावली पाटकर, अस्मिता वाढोकार, रिया भांबुरे आदी उपस्थित होते.