You are currently viewing सामाजिक चातुर्मासाचे १३ वे पुष्प संपन्न

सामाजिक चातुर्मासाचे १३ वे पुष्प संपन्न

वैभववाडी

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वतीने ऑनलाईन सामाजिक चातुर्मास-२०२१ अंतर्गत बौद्धिक प्रबोधनपर व्याख्यानमालेचे १३ वे पुष्प रविवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार ते साडेसहा या वेळेमध्ये संपन्न झाले.


ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित सामाजिक चातुर्मास-२०२१ अंतर्गत बौद्धिक प्रबोधनपर व्याख्यानमालेचे तेरावे पुष्प संस्थेचे राज्य सचिव मा.अरुण वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या कार्यक्रमाला शासकीय अधिकारी तथा प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग समाज कल्याण विभागाचे उप आयुक्त मा. प्रमोद जाधव यांनी “सहज सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी” या विषयावर मार्गदर्शन केले. विशिष्ट प्रवर्गातील व्यक्तींना आपल्या हक्क आणि अधिकार प्राप्तीसाठी जात प्रमाणपत्र आवश्यक असते. विशेषतः विद्यार्थी, नोकरदार तसेच निवडणुक उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र गरजेचे असते. त्यामुळे संबंधित व्यक्तीने योग्य माहिती आणि पुराव्यासह पाच ते सहा महिने अगोदर प्रस्ताव सादर केल्यास त्याची चौकशी होऊन प्रमाणपत्र मिळणे सुलभ होते. जात प्रमाणपत्र पडताळणीची सविस्तर प्रक्रिया काय आणि कशी आहे याची काही उदाहरणांसह सविस्तर माहिती दिली.


तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसाय महासंघाचे कार्याध्यक्ष श्री.सतीश पाटणकर यांनी “पर्यटनातील मानबिंदू- सिंधुदुर्ग” या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने कसा समृद्ध आहे याबाबत मार्गदर्शन केले. संपूर्ण कोकण पट्ट्यातील सिंधुदुर्ग जिल्हा विविधतेने कसा नटलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने येथील समुद्र किनारा, येथील गड- किल्ले, जुन्या वास्तु, उद्योग, व्यवसाय, खाद्यसंस्कृती याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. एवढेच नव्हे तर जिल्ह्याची पर्यटनाच्यादृष्टीने विविध भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या वेबसाईटचा लाभ घ्यावा. महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशभरातील पर्यटकांनी जिल्ह्याला भेट देऊन तेथील विविधांगी पर्यटनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने महाराष्ट्रातील जवळजवळ २२ जिल्ह्यांमध्ये ग्राहक प्रबोधन, ग्राहक संघटन आणि ग्राहक मार्गदर्शनाचे काम सुरू आहे. ग्राहक चळवळीचे प्रणेते ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी यांनी सामाजिक चातुर्मासाच्या माध्यमातून समाज जागृती करण्याचे कार्य केले. त्यांची सामाजिक चातुर्मासाचे परंपरा पुढे चालू ठेवून जुलै २०२१ पासून नोव्हेंबर २०२१ पर्यंत अशी चार महिने ही प्रबोधन व्याख्यानमाला सुरू राहणार आहे. या सामाजिक चातुर्मासाच्या माध्यमातून विविध जिल्ह्यातील शासकीय अधिकारी आणि सामाजिक क्षेत्रांमधील मान्यवर व्यक्ती यांना आमंत्रित करून सर्वसामान्य नागरिकांना माहिती देऊन त्याचे प्रबोधन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात ग्राहक चळवळीचे अधिष्ठान स्वामी विवेकानंद,ग्राहक चळवळीचे प्रणेते ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी आणि सामाजिक चातुर्मासाचे दैवत लक्ष्मीनारायण यांची प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण विभागाचे अध्यक्ष व राज्य सदस्य प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी केले. सौ. वैशाली रुगे यांनी “साधना का पथ कठिण है” हे ग्राहकगीत व शेवटी पसायदान सादर केले. प्रमुख अतिथी मा.प्रमोद जाधव यांची ओळख श्री.नंदकिशोर साळसकर यांनी करून दिली तर प्रमुख वक्ते मा. सतिश पाटणकर यांची ओळख श्री. सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी करून दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.संजीवनी पाटील यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून श्री. महेश चावला यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. संदेश तुळसणकर यांनी माडले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण विभागातील सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा