सावंतवाडी मनसेची मागणी
सावंतवाडी
येथील कृषी कार्यालयातील महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या “त्या” कृषी पर्यवेक्षकावर कडक कारवाई करा, अन्यथा त्या अधिकाऱ्याला तालुक्यात थारा दिला जाणार नाही, असा इशारा आज मनसेच्या वतीने शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळे यांना दिला आहे. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांची या प्रकरणी चौकशी सुरू असून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर नक्कीच प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे आश्वासन श्री. अडसूळे यांनी दिले. याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज श्री. अडसूळे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, कृषी विभागात कार्यरत असलेल्या कृषी पर्यर्वेक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तालुक्यातील कृषी सहाय्यक महिलांच्या बाबतीत असभ्य वर्तन केले जात आहे. यापूर्वी तो अधिकारी कणकवली, कुडाळ कृषी कार्यालयात कार्यरत असताना त्याने असेच प्रताप केले आहेत. त्याचीच पुनरावृत्ती आता सावंतवाडीत झाली असून अशा अधिकाऱ्यांना यापूढे सावंतवाडी तालुक्यात थारा देणार नाही. त्या अधिकार्यावर कडक कारवाई केली करा, अन्यथा मनसे स्टाईल धडा शिकवला जाईल असा इशारा दिला.
यावेळी श्री. कासकर म्हणाले, तो वादग्रस्त अधिकारी यापुढे तालुक्यात येता कामा नये याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. त्या अधिकाऱ्याच्या अगोदरच्या घटना पहिल्या असता अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे असे सांगितले.