मुंबई
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा 15 नोव्हेंबरपासून ऑफलाईन पद्धतीने सुरू होणार आहेत.
यासाठी लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याची माहिती आज सीबीएसईकडून देण्यात आली.
शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील सीबीएसई बोर्डाची दहावी, बारावीची परीक्षा दोन टप्प्यांत होणार आहे. पहिले सत्र नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये होणार आहे. या महिन्यात परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक cbse.gov.in आणि cbse.nic.in या वेबसाईटवर जाहीर केले जाणार आहे. टर्म २ ची परीक्षा मार्च ते एप्रिल २०२२ दरम्यान घेतली जाणार आहे. टर्म १ परीक्षेचे आयोजन ४ ते ८ आठवड्यांमध्ये केले जाईल.
प्रथम सत्राच्या परीक्षेत मल्टीपल चॉईस प्रश्न विचारले जातील. या परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असेल. प्रत्येक टर्ममध्ये ५० टक्के अभ्यासक्रमाचा समावेश असून बोर्डाच्या वेबसाइटवर जाऊन विद्यार्थी सुधारित अभ्यासक्रम डाउनलोड करू शकतील, अशी माहिती सीबीएसईकडून देण्यात आली. तसेच दहावी आणि बारावीच्या कोणत्याही मुख्य विषयांची परीक्षा एकाच दिवशी होणार नाही, असेही सीबीएसईने स्पष्ट केले आहे.