You are currently viewing इतिहास विषय वाचनापेक्षा समजून घेणे गरजेचे…

इतिहास विषय वाचनापेक्षा समजून घेणे गरजेचे…

– शिवराज गायकवाड

 सिंधुदुर्गनगरी

स्पर्धा परीक्षेसाठी इतिहास विषयाचा अभ्यास करताना वाचनापेक्षा समजून घेण्यावर भर द्यावा, असे  प्रतिपादन  दोडामार्ग नगर पंचायतीचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांनी केले. इतिहासातील घटना, सामाजिक, राजकीय व्यवस्था यांचा टप्प्या-टप्प्याने अभ्यास करावा, जेणेकरुन लक्षात ठेवणे सोयीस्कर होईल असेही श्री. गायकवाड म्हणाले.

प्रेरणा उपक्रमाअंतर्गत आज स्पर्धा परीक्षांविषयी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, दोडामार्ग नगर पंचायतचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड आणि वैभववाडी नगर पंचायतचे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी प्रेरणा अंतर्गत जिल्हा प्रसासनाच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करता येईल याबाबत या सत्राची प्रस्तावना करताना माहिती दिली.

अभ्यास करताना लक्षात न राहणाऱ्या गोष्टी किंवा घटनेच्या नोट्स काढून एका वहीत लिहून ठेवाव्यात व त्याचा सराव करावा असे सांगून श्री. गायकवाड म्हणाले, ज्या ज्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात त्या गोष्टी वगळून पुन्हा एक मायक्रो नोट्स तयार कराव्यात. जेणेकरुन आपला अभ्यास सोपा होईल. स्पर्धा परीक्षामध्ये अपयश आल्यास खचून जावू नका. बरेच विद्यार्थीं हे मुखालखीच्या टप्प्यापर्यंत पोहोचून त्यांना पद मिळत नाही. त्यावेळी आपला आत्मविश्वास कमी पडू देवू नका. मानसिक तणाव निर्माण झाल्यास ज्या गोष्टीपासून आनंद मिळतो त्या गोष्टी करा. त्यामुळे मानसिक तणावातून मुक्त व्हाल. स्वत:शी प्रामाणिक राहा. स्पर्धा परीक्षाची सुरुवात करताना ज्या विषयाची आवड आहे, त्या विषयापासून अभ्यासाची सुरुवात करा. एमपीएससी अथवा युपीएससीचा अभ्यास करताना आपण पूर्व परीक्षेवर फोकस करावा. पूर्व परीक्षा हा  पहिला टप्पा आहे.

यावेळी बोलताना श्री. कांबळे म्हणाले, अभ्यासाची सुरुवात करताना प्रथम आपण आयोगानी दिलेला अभ्यासक्रम वाचावा. तसेच मागील परीक्षेच्या पेपर्सचा सराव करावा. अधिकृत बेसीक पुस्तकांचे वाचन करा. स्टेट बोर्ड, एनसीआरटीचे पुस्तक वाचणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरुन अभ्यासक्रमाचा अंदाज येईल. भाषा निवडतांना ज्या भाषेत वाचायला आवडते अथवा जी भाषा समजते त्या भाषेची निवड करावी. या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी  सातत्याने अभ्यास करणे व प्रयत्नांमध्ये कमतरता पडू न देणे महत्वाचे आहे. फक्त  स्पर्धा परीक्षांकडेच लक्ष न देता एखादा दुसरा पर्यायही सोबत ठेवणे हे भवितव्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. योग्य वेळी योग्य पर्याय निवडणे गरजेचे आहे. सर्व विषयांचा अभ्यासही तितकाच महत्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

            यावेळी एमपीएससीच्या परीक्षांचे स्वरुप, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, पुस्तकांची निवड, अभ्यास पद्धती याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा