You are currently viewing सावंतवाडी पंचायत समितीच्या पंचवार्षिक विकास आराखड्याला मंजुरी

सावंतवाडी पंचायत समितीच्या पंचवार्षिक विकास आराखड्याला मंजुरी

पंधराव्या वित्त आयोगांतर्गत १ कोटी २२ लाख ६१ हजार रुपयांचा निधी

सावंतवाडी

सावंतवाडी पंचायत समितीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या १ कोटी २२ लाख ६१ हजार रुपयांच्या पंचवार्षिक विकास आराखड्याला सभापती सौ. निकिता सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेमध्ये मंजुरी देण्यात आली. यामध्ये पन्नास टक्के निधी बंधीत तर पन्नास टक्के अबंधीत खर्च करण्याचे ठरविण्यात आले.

सावंतवाडी पंचायत समितीला केंद्रशासनाच्या १५ व्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीच्या अनुषंगाने पंचवार्षिक विकास आराखड्याला मंजुरी देण्यासाठी तसेच मागील पंचवीस वर्षे विकास आराखड्यातील राहिलेल्या कामा मधील बदल सुचवण्यासाठी विशेष सभेचे आयोजन येथील पंचायत समितीच्या सभागृहांमध्ये करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर सभापती सौ. निकिता सावंत उपसभापती शीतल राऊळ, गटविकास अधिकारी रवींद्र कणसे, सहाय्यक गटविकास अधिकारी वासुदेव नाईक आदी उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला विकास आराखड्याचे वाचन करण्यात आले. यावेळी उपस्थित सदस्यांच्यावतीने माजी सभापती तथा विद्यमान सदस्य रवींद्र मडगावकर यांनी विकास कामे सुचवताना व त्याचा आराखड्यामध्ये समावेश करताना कोणत्या प्रकारची तांत्रिक चूक राहू नये याची खबरदारी खासकरून अधिकाऱ्यांकडून घेण्यात यावी अन्यथा हा एका सदस्याने सुचवलेल्या कामातील चुकीचा फटका इतर सर्व सदस्यांना बसतो त्यामुळे विहित मुदतीत विकास कामासाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांबाबत पूर्तता करून घ्या असे स्पष्ट केले. तसेच ज्या कामांना अडचण उद्भवेल व जी कामे या विकास आराखड्यामध्ये बसू शकणार नाही, अशी कामे अधिकाऱ्यांकडून वाचन करण्यात यावी असे सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी उप अभियंता टेमकर यांनी आणि पाणीपुरवठा विभागाचे राणे यांनी अडचणीच्या कामाबाबतचे वाचन केले. त्यात सदस्य पंकज पेडणेकर संदीप नेमळेकर यांनी चर्चेत सहभाग घेऊन काही कामांमध्ये बदल सुचविला तसेच मार्गदर्शन केले. बैठकीत तब्बल नव्वद विकासकामांचे वाचन करण्यात आले त्यामध्ये पाणी पुरवठा तसेच बांधकाम विभागाच्या साताऱ्यातील कामांचा समावेश आहे यातील बरेच या कामातील बदल लक्षात घेता हा आकडा कमी जास्त होण्याची शक्यता आहे असे संबंधित अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

मात्र प्राप्त होणाऱ्या १ कोटी २२ लाख ६१ हजार रुपयाच्या निधीतील पन्नास टक्के निधी हा बंधित व पन्नास टक्के निधी अबाधित कामासाठी खर्च करण्याचे ठरविण्यात आले, यातील बंधित कामात पाणी पुरवठा स्वच्छता गटार या कामाचा सहभाग येतो तर अबंधित कामामध्ये इतर बांधकाम म्हणजे रस्ते नूतनीकरण, खडीकरण, स्मशानशेड अन्य कामाचा सहभाग येतो. यावेळी गटविकास अधिकारी श्री कणसे यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येक विभागाने आपल्या कामाचे जबाबदारी स्वीकारून संबंधित आराखडा परिपूर्ण करण्यासाठी कामाला लागावे अशा सूचना केल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा