सोशल मीडियाला मिळणार मर्यादित पास; चिपी विमानतळ उदघाटन कार्यक्रम: जिल्हाधिकाऱ्यांचे आबा खवणेकर यांनी मानले आभार
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ उद्घाटन प्रवेशाचे मर्यादित क्षमतेने पास देण्यास जिल्हा प्रशासनाकडून मान्यता देण्यात आली असून जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून, सुवर्णमध्य काढल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानून जिल्ह्यातील युट्युब चॅनेल धारक व सोशल मिडिया पत्रकारांच्या वतीने करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या प्रयत्नांना यश आल्याचे समाधान व्यक्त करत धरणे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा उर्फ आबा खवणेकर यांनी दिली.
जिल्ह्यातील चिपी येथील बहुचर्चित विमानतळाचे उद्घाटन शनिवार दि. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी होत आहे, त्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील युट्युब चॅनेल धारक व सोशल मीडिया पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला होता, यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेने आक्रमक पवित्रा घेऊन विमानतळाच्या गेट समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी बोलवून घेऊन यशस्वी शिष्टाई केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,माहिती व जनसंपर्क महासंचालक दिलीप पाढरपट्टे ,जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक तसेच जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी समाधान व्यक्त करत आभार मानले. कोविड संक्रमणाचे प्रमाण कमी झाले असले तरी अजूनही कोरोना हद्दपार झालेला नाही, त्यामुळे जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्यामुळे जिल्ह्यातील पत्रकारांना मर्यादित क्षमतेने प्रवेश परवाने देण्यात यावे असे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या मागणीला यश आले आहे. चिपी विमानतळ उद्घाटनाच्या प्रवेशासाठी जिल्ह्यातील युट्युब चॅनेल धारक व सोशल मिडिया पत्रकारांना पूर्ण क्षमतेने प्रवेश देण्यात आला. यामध्ये युटूब व सोशल मिडीयाच्या पाच पत्रकारांना अखेर प्रवेश पास देण्यात आला आहे.त्यामुळे विमानतळ उद्घाटनाच्या दिवशी आयोजन करण्यात आलेले धरणे आंदोलन मागे घेण्यात आले असल्याचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी सांगितले.