You are currently viewing देवा मी चाललो!

देवा मी चाललो!

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक, समीक्षक, कवी मुबारक उमरानी यांची भक्तिमय रचना

देवा मी चाललो,सोडुनि पंढरी
माय चंद्रभागा,अश्रूधारा पूर
दिसेना कोठेच,पुंडलिक माझा
शोधता शोधता,भरे माझे ऊर

येथेच शिकलो,अंभंग नि ओवी
मृदुंग वाजता,टाळ ते नाचले
अभंग, कीर्तनी,वारकरी दंग
राम कृष्ण हरी,एकत्र वाचले

डोई ती तुळस ,माय माझी चाले
पायी तिच्या फोड,मुखी विठू नाम
दिसता पंढरी,हरी नाम घोष
डोळा दिसे झेंडा,भेटे मुक्तीधाम

सोडू रे वाटेना,तुझी रे पायरी
ह्दयी विठ्ठल, नाद ब्रम्ह घुमे
कपाळी रे गंध,ती तुळशीमाळ
अभंगी नाचता,मन इथे रमे

धावलो रंगलो,रिंगन सोहळा
माणसाचा मीही, झालो रे माऊली
पदस्पर्श घेता,पाप गेले सारे
झाड होई बाप,देई रे सावली

ज्ञानेश्वरी गाथा,चोख्याचे अभंग
पालखी सोहळे,कसे सोडू सांग?
बघ देवा तुच, कैक ते चालले
आपुल्या त्या गावी, रस्ता दिसे रांग

मज बोलवती,हाका देती मित्र
नको मला काही,असो रे आशिष
तुझे नाम घेता,शुध्द होई वाचा
तुझ्याच चरणी, राहो माझे शिश

©मुबारक उमराणी
सांगली
मो.९७६६०८१०९७.

प्रतिक्रिया व्यक्त करा