You are currently viewing आश्वासनाची पूर्तता न झाल्यास शाळा रस्त्यावर भरविणार – जयेंद्र रावराणे यांचा इशारा

आश्वासनाची पूर्तता न झाल्यास शाळा रस्त्यावर भरविणार – जयेंद्र रावराणे यांचा इशारा

वैभववाडी

तालुक्यातील रस्ते दुरावस्थेला संबंधित अधिकारी व ठेकेदार जबाबदार आहेत. नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु रस्ते निर्धोक नसल्याने विद्यार्थी शाळेत येणे बंद झाले आहे. हा प्रश्न 17 विद्यालयातील विद्यार्थ्यांना सतावत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यास पुन्हा विद्यार्थिनींचा मोर्चा काढणार व शाळा रस्त्यावर भरवणार असा इशारा माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी दिला आहे. रस्ते दुरुस्तीचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत अधिकाऱ्यांना शाळेच्या बाहेर सोडणार नाही. असा आक्रमक पवित्रा जयेंद्र रावराणे यांनी घेतल्याने बैठकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

तालुक्यातील प्रमुख रस्ते दुरुस्त करा, या मागणीसाठी येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर संबंधीत अधिका-यांनी आज विद्यालयात धाव घेतली. व विद्यालय प्रशासनाशी चर्चा केली. चर्चेनंतर लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
या बैठकीला तहसीलदार रामदास झळके, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, सार्वजनिक बांधकाम अधिकारी श्री कांबळे, जिल्हा परिषद बांधकाम अधिकारी श्री. सुतार, माजी नगरसेवक संजय सावंत, व्यापारी मंडळ अध्यक्ष रत्नाकर कदम, कनिष्ठ अभियंता श्री. सुतार, श्री दुडये आदी उपस्थित होते.

जयेंद्र रावराणे यांनी तालुक्यातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांचा पाढा वाचला. रस्त्यांवर विहिरीच्या आकाराचे खड्डे आहेत. तर काही रस्त्यांवर नाल्याचे स्वरूप दिसत आहेत. याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला. रस्त्यावरून सायकल चालवून दाखवा. मुख्यमंत्री सडक च्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या काँजव्यांना कठडे नाहीत. दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल जयेंद्र रावराणे यांनी उपस्थित केला.

हा लढा माझ्या स्वार्थासाठी नसून सतरा विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आहे. आणि तो मी सुरूच ठेवणार आहे असं श्री. रावराणे यांनी सांगितले. तहसीलदार श्री झळके, पोलीस निरीक्षक श्री. जाधव यांच्या विनंतीवरून व संबंधित अधिकार्‍यांनी लेखी आश्‍वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित करत आहे. परंतु या आश्वासनाकडे अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्यास कोणतीही पूर्वकल्पना न देता शाळा रस्त्यावर भरविणार असा इशारा श्री. रावराणे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा