हजारहून अधिक सेप्टिक टँकवर व्हेंट पाईप जाळी बसविणार
कणकवली
मच्छरांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कणकवली नगरपंचायतच्यावतीने शहरातील 5 हजारहून अधिक सेप्टिक टँकवर व्हेंट पाईप जाळी बसविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आरोग्य सभापती अभि मुसळे यांनी दिली. पावसाळ्यात पाण्याची डबकी साचून मच्छरांची पैदास वाढते. त्यापेक्षाही शौचालयांमध्येही मच्छरांची पैदास जास्त होते. शहरात मच्छरांची पैदास होऊ नये यासाठी उघड्या जागेवरील डबकी, आणि गटारांमध्ये फवारणी करून डास निर्मिती रोखण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र सेप्टिक टॅंक मधून बाहेर पडणाऱ्या डासांवर आता नामी उपाय काढण्यात आला आहे. शौचालय टाकीवर बसवलेल्या व्हेंट पाईप मधून मच्छर बाहेर पडतात. यावर नामी उपाय म्हणून शहरातील 5 हजार हुन अधिक सर्व सेप्टिक टँकला कणकवली नगरपंचायत च्या वतीने मोफत व्हेंट पाईप जाळी बसविण्यात येणार आहेत.
या जाळीमुळे व्हेंट पाईपमधून बाहेर पडणारे डास जाळीतच अडकून पडतातआणि कालांतराने मरतात . त्यामुळे सेप्टिक टॅंक मधून बाहेर पडणाऱ्या डासांवर आपोआपच निर्बंध येतात. साहजिकच त्यामुळे डासांमुळे होणारे तापासारखे साथरोग आटोक्यात येऊन शहरातील नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत राहण्यास मदत होणार आहे. व्हेंट पाईप जाळी बसविण्यासाठी येणारे कामगार प्रत्येक सेप्टिक टॅन्कचा सर्वेही करणार आहे. ज्या नागरिकांच्या वैयक्तिक घराचा अथवा निवासी किंवा व्यावसायिक इमारतीचा सेप्टिक टॅंक नादुरुस्त असेल तर तशी नोंद नगरपंचायत मध्ये केली जाणार आहे. तसेच नगरपंचायत च्या वतीने संबंधित प्रॉपर्टी मालकास सेप्टिक टॅंक तात्काळ दुरुस्त करून घेण्याविषयी कळविण्यात येणार आहे. जेणेकरून नादुरुस्त सेप्टिक मधून होणार डास फैलाव रोखला जाऊ शकेल. व्हेंट पाईप जाळी मुळे शहरातील डास फैलाव रोखून कणकवलीवासीयांचे आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होणार आहे.