You are currently viewing कुठे हरवला माझा ….

कुठे हरवला माझा ….

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना

सुगरणीचे घरटे ते बाभळीवरती दिसे
गाडवाटेने चालता मन माझे हसतसे
किती सुंदर ती कला मन हरखून जाई
परकरातली मी ती झाडाखाली उभी राही …

मळ्यातल्या रस्त्यावर झरा झुळू झुळू वाहे
पाय पोळती मातीत पाय बुडवित जाये
बोरीवरची ती बोरे तोंडाला ते येई पाणी
बोरे ओच्यात भरून गात असूत हो गाणी ….

बांधाबांधाने फिरे ती हुप्प्या वानरांची टोळी
त्यांना पाहता वळे हो भीतीनेच ती बोबडी
नाही काढत ते खोड्या उड्या मारत पळती
कुठे गेले सारे आता का हो लागली गळती…

चिंचा आलेल्या पाडाला काठीने त्या झोडपत
ओचा भरून वाटेने जात असू खात खात
नाही आंबले हो दात नाही आलाच खोकला
नाही चालत आता हो दिला तर तो दाखला ….

मळ्यातल्या वाटेवर नाही लागतसे ऊन
बांधा बाधाला जवारी मला करतसे खूण
डुलतसे वाऱ्यावर पोघ्यातली नऊवारी
तिच्या मधून चालता मला वाटतसे भारी ….

मळ्याच्या त्या वाटेवर भले आवळ्याचे झाड
हलवून हो तयाला म्हणतसू पड पड
पाणी मोटेचे पडे ते धबकन् थाळण्यात
मेरे मेरेने नागिण जात असे ती धावत …

हादग्या खाली बसून ती कांदा भाकर चटणी
तोंडा येते आता पाणी सुंदर त्या आठवणी
झोका जाई दूर दूर मन गातसे पारवा
कुठे हरवला माझा मळा गच्च तो हिरवा….

प्रा. सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा